शेकडो हेक्टरवरील सोयाबीन पेरणी उलटली!

By Admin | Updated: July 29, 2014 20:15 IST2014-07-29T20:15:33+5:302014-07-29T20:15:33+5:30

अकोला जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील महाबीज व इतर खासगी कंपन्यांचे पेरलेले सोयाबीनचे महागडे बियाणे उगवलेच नसल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारीचा ओघ वाढला

Soybean sown on hundreds of hectares sown! | शेकडो हेक्टरवरील सोयाबीन पेरणी उलटली!

शेकडो हेक्टरवरील सोयाबीन पेरणी उलटली!

अकोला : जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील महाबीज व इतर खासगी कंपन्यांचे पेरलेले सोयाबीनचे महागडे बियाणे उगवलेच नसल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारीचा ओघ वाढला असून, दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावर्षी पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊ स झाल्यानंतर शेतकर्‍यांनी सोयाबीन पेरणी केली आहे. आजमितीस जिल्ह्यात जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्रावर शेतकर्‍यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे. १५ व २३ जुलै रोजी पडलेल्या दमदार पावसामुळे शेतकर्‍यांनी पेरणीचा वेग वाढवल्याने गुरुवारपर्यंत ६५ टक्के क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. हा पाऊस सोयाबीन पिकाला पोषक ठरणार असल्याचे सांगण्यात येत होते. तथापि, पोषक ठरण्याऐवजी शेकडो हेक्टरवरील सोयाबीन उगवलेच नाही. गेल्यावर्षी अतवृष्टीने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले, तर यावर्षी पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यात सर्वाधिक महाबीजच्या बियाण्यांचा समावेश असून, खासगी कंपन्यांचे बियाणे काही ठिकाणी उगवले नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. अकोला तालुक्यात कौलखेड जहागीर, रामगाव, खडकी, बोंदरखेड, चांचोडी आदी अनेक गावच्या शेतकर्‍यांचे सोयाबीन उगवले नाही. या संदर्भात कौलखेड व रामगावच्या शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या आहेत. गेल्या वर्षी झालेली अतवृष्टी आणि त्यानंतर रब्बी हंगामात गारपिटीमुळे झालेल्या पीक नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला असताना यावर्षीच्या खरीप पेरणीत पेरलेले सोयाबीनचे महागडे बियाणे पेरल्यानंतर उगवले नसल्याने शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. त्यामुळे यासंदर्भात चौकशी करून, शेतकर्‍यांना पेरणीकरिता सोयाबीन बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी कौलखेड जहागीर व रामगाव येथील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे. गतवर्षी शेतकर्‍यांनी पीक विमा काढला असता आणि आणेवारी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी असताना विमा कंपनीकडून संबंधित शेतकर्‍यांना पीक विम्याची रक्कम दिली नाही. याबाबत चौकशी करून शेतकर्‍यांना तातडीने विम्याची रक्कम देण्यात यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Soybean sown on hundreds of hectares sown!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.