पातूर तालुक्यात सोयाबीनचा पेरा वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST2021-06-18T04:14:03+5:302021-06-18T04:14:03+5:30
पातूर : पातूर तालुक्यात सार्वत्र पाऊस नसल्याने केवळ आठ टक्केच क्षेत्रावर पेरणी झाली असून, उर्वरित क्षेत्रावर पुरेशा पावसाअभावी पेरण्या ...

पातूर तालुक्यात सोयाबीनचा पेरा वाढणार
पातूर : पातूर तालुक्यात सार्वत्र पाऊस नसल्याने केवळ आठ टक्केच क्षेत्रावर पेरणी झाली असून, उर्वरित क्षेत्रावर पुरेशा पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. यावर्षी सोयाबीनचा पेरा अधिक वाढणार असून कपाशीसह इतर पिकांचे क्षेत्र घटणार असल्याचे चित्र आहे.
तालुक्यात ४२ हजार ५७० हेक्टर क्षेत्र वहितीखाली आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार २५ हजार ५०० हेक्टरवर सोयाबीनची लागवड होण्याचा अंदाज आहे. ८ हजार ४४५ हेक्टरवर कपाशीची लागवड होणार आहे. ७ हजार ५०० हेक्टरवर तुरीची लागवड तर १४ हजार ५०० हेक्टरवर मूग, उडीद हेक्टरवर पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.
पातूर तालुक्यातील आलेगाव आणि पातूर मंडळ वगळता चान्नी, सस्ती आणि बाभूळगाव या मंडळातील क्षेत्रामध्ये अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागातील पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाअभावी पेरणी झालेल्या शेतकऱ्यांची आणि पेरणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांचे आभाळाकडे लक्ष लागले आहे. तालुक्यातील ८० टक्के शेतकऱ्यांनी बी बियाणांची खरेदी केली आहे. मात्र, प्रमाणित बियाण्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सत्यता दर्शक बियाणे स्वतःच्या जोखमीवर कृषी सेवा केंद्रावरून खरेदी करावी लागतात. मात्र, कृषी सेवा केंद्र चालक महाबीज बियाण्यांचा काळाबाजार करीत असल्याची तक्रार तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे शेतकरी करीत आहेत.
फोटो:
तालुक्यात सोयाबीन, कपाशी बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा
तालुक्यात सोयाबीन, कपाशी, तूर बियाण्यांची कृत्रिम तुटवडा निर्माण करून जादा दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे येत आहेत. महाबीज बियाणे दुप्पट दराने विकले जात असल्याची माहिती आहे. बियाण्यांचा तुटवडा आणि कृत्रिम टंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांनी घरचेच बियाणे प्रक्रिया करून वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांनी बीबीएफ पेरणी यंत्रणेचा वापर, प्रक्रिया करूनच घरगुती बियाण्यांचा वापर करावा. तालुक्यात अद्यापही १०० मिलिमीटर पाऊस पडला नाही, त्यामुळे पुरेसा पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. दुबार पेरणीचे संकट सर्वांनी टाळावे.
-डी. एस. शेटे, तालुका कृषी अधिकारी, पातूर
आठ टक्के सोयाबीन, कपाशीची पेरणी
पातूर तालुक्यात ३४५० हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली. तसेच ९४५ हेक्टरवर कपाशी, ३०० हेक्टरवर तूर २५ हेक्टरवर मूग आणि १८ हेक्टरवर उडदाची पेरणी करण्यात आली. तालुक्यात एकूण आठ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे.