सोयाबीन बियाण्याचे दर आवाक्याबाहेर!
By Admin | Updated: June 2, 2014 01:47 IST2014-06-02T01:44:42+5:302014-06-02T01:47:22+5:30
पेरण्या सुरू होण्यापूर्वीच सोयाबीन बियाण्याच्या किमतीत प्रतिबॅग ९00 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

सोयाबीन बियाण्याचे दर आवाक्याबाहेर!
संतोष येलकर / अकोला
या वर्षीच्या खरीप हंगामातील पेरण्या सुरू होण्यापूर्वीच सोयाबीन बियाण्याच्या किमतीत प्रतिबॅग ९00 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत बियाणे कंपन्यांकडून यावर्षी सोयाबीन बियाण्याच्या किमती भरमसाठ वाढविण्यात आल्याने, सोयाबीन बियाण्याचे दर शेतकर्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. सोयाबीन कापणीच्या वेळी पावसामुळे सोयाबीन बियाणे भिजले. त्यामुळे उगवणक्षमता कमी झाल्याने, विविध कपन्यांचे सोयाबीन बियाणे ह्यनापासह्ण झाले. त्यामुळे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळासह (महाबीज) विविध खासगी कंपन्यांकडून बाजारात होणारा सोयाबीन बियाण्याचा पुरवठा कमी होत आहे. बियाणे कमी उपलब्ध असल्याची संधी हेरून बियाणे कंपन्यांकडून सोयाबीन बियाण्याच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढविण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकर्यांकडून मागणी असलेल्या सोयाबीन या प्रमुख वाणाच्या बियाणे दरांमध्ये यावर्षी ९00 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच कमी मागणी असलेल्या सोयाबीन बियाण्याच्या दरातही ४00 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरण्या सुरू होणे अद्याप बाकी असतानाच, सध्या बाजारात ह्यमहाबीजह्णचे सोयाबीन बियाणे ३0 किलोची प्रतिबॅग २ हजार ३८५ रुपये दराने बियाणे विक्रेत्यांकडून विकली जात आहे. तर शेतकर्यांची मागणी असलेल्या प्रमुख कंपन्यांचे सोयाबीन बियाणे २ हजार ५५0 रुपये ते २ हजार ६३0 रुपये दराने विकले जात आहे. त्यामुळे खरीप पेरण्या सुरू होण्यापूर्वीच यावर्षी सोयाबीन बियाण्याचे दर शेतकर्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे दिसत आहे. पेरण्या सुरू झाल्यानंतर सोयाबीन बियाण्यासाठी शेतकर्यांच्या मागणीत वाढ होणार आहे; त्यासोबतच सोयाबीन बियाण्याच्या दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.