काही जीम बाहेरून बंद, आत सुरू; प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 11:17 AM2020-03-18T11:17:56+5:302020-03-18T11:18:04+5:30

काही जीम आतमध्ये सुरूच असल्याचे लोकमतने मंगळवारी केलेल्या पाहणीत समोर आले.

Some gyms open from inside; Regardless of administration | काही जीम बाहेरून बंद, आत सुरू; प्रशासनाचे दुर्लक्ष

काही जीम बाहेरून बंद, आत सुरू; प्रशासनाचे दुर्लक्ष

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : देशात कोरोनाचे पॉझिटिव्ह व संशयित रुग्ण आढळताच राज्य शासनाने शाळा-महाविद्यालय बंद केल्यानंतर मॉल व जीमही बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे; मात्र त्यानंतरही अकोला शहरातील काही जीम संचालकांनी त्यांचे जीम बाहेरून बंद केले; मात्र काही जीम आतमध्ये सुरूच असल्याचे लोकमतने मंगळवारी केलेल्या पाहणीत समोर आले.
कोरोना आजाराचे राज्यात ३९ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. तर संशयितांचा आकडा शंभरावर गेला आहे. जिल्ह्यातही मंगळवारी आणखी २ जणांना तपासणी करुन त्यांचे स्वॅब नमुने घेऊन प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कोरोनाचे संशयित अकोल्यात दाखल झाल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कडक सूचना देत जीम बंद ठेवण्याचे सांगितले आहे; मात्र त्यानंतरही अकोला शहरातील जीमचे वास्तव पाहण्यासाठी लोकमतच्या चमूने मंगळवारी सकाळी ६ वाजतापासून ते १० वाजेपर्यंत जीमची पाहणी केली असता ५ ते ६ जीम हे बाहेरून बंद करून आतमध्ये सुरू असल्याचे उघडकीस आले. तर काही जीम संचालकांनी त्यांचे जीम बंद ठेवल्याचेही या पाहणीत समोर आले. शहरातील जीम सुरू आहेत किंवा बंद याची तपासणी किंवा पाहणी मात्र प्रशासनाकडून करण्यात आली नसल्याचेही या पाहणीत उघड झाले.


जीमसमोर वाहनांची गर्दी
शहरातील जीम संचालकांनी प्रशासनाला अंधारात ठेवून जीम बाहेरून बंद केले; मात्र आतमध्ये डीजेचा साउंड सुरू असल्याचे दिसून आले. तर जीमच्या खाली वाहनांची मोठी गर्दीही लोकमतने केलेल्या पाहणीत दिसली. यावरून जीम संचालकांनी चतुरी करीत जीम सुरू ठेवले; मात्र वाहनांची गर्दी तसेच गाण्यांचा आवाज जीमच्या बाहेर स्पष्ट येत असल्याचे या पाहणीत उघड झाले.


या भागातील जीमची पाहणी
लोकमतच्या विविध चमूने शहराच्या वेगवेगळ्या भागातील जीमची पाहणी केली. यामध्ये गोरक्षण रोड, जठारपेठ, सिव्हिल लाइन्स, मराठा नगर, कौलखेड, रिंग रोड, सिंधी कॅम्प, जुने शहर, डाबकी रोड या परिसरातील जीम सुरू आहेत किंवा बंद याची पाहणी करण्यात आली. यामधील काही जीम आतून सुरू होते, काही ठिकाणी साफसफाई करण्यात येत होती. तर काही जीम सपशेल बंद ठेवले.


वर्कआउट फ्रॉम होम
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्याच्या उद्देशाने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व जीम बंद ठेवण्याचा आदेश आहे. या पृष्ठभूमीवर शहरातील बहुतांश जीम संचालकांनी त्यांचे वर्कआउट स्टेशन बंदच ठेवले आहे. जीममध्ये नियमितपणे येणाऱ्यांचा व्यायाम बंद पडू नये, यासाठी काही जीम संचालकांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरूनच त्यांच्या सदस्यांना सूचना देण्याचा फंडा शोधून काढला आहे. कोणता व्यायाम प्रकार करावा, किती अंतर चालावे, एनर्जी ड्रिंक, आहार, फिटनेसबाबतच्या सूचना व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून देण्यात येत असल्याचे फिटनेस क्लबचे संचालक धनंजय भगत यांनी सांगितले.

Web Title: Some gyms open from inside; Regardless of administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.