अब तक ५१...

By Admin | Updated: August 20, 2014 22:13 IST2014-08-20T22:13:37+5:302014-08-20T22:13:37+5:30

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांना शवविच्छेदन गृहापर्यंत नेण्याचे ७ वर्षांपासून अविरत कार्य

So far 51 ... | अब तक ५१...

अब तक ५१...

वाशिम : पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतरही बेरोजगारीच नशीबी आली. उदरनिर्वाहासाठी ऑटो चालविण्याचा व्यवसाय निवडला. परिस्थीती तशी बेताचीच परंतू तरीही गुरुकडून घेतलेला समाजकार्याचा वसा जपण्याचे काम मंगरुळपीर तालूक्यातील आदर्श ग्राम वनोजाचे रहिवासी घनश्याम विश्राम गावंडे आहेत. अपघात झाल्यानंतर त्याजवळही माणुसकी नात्याने कोणी जात नाही परंतु घनश्याम त्या शवाला शवविच्छेदन गृहापर्यंत नेण्याचे काम गत सात वर्षांपासून अविरत करीत आहे. आतापर्यंत त्यांने ५१ शव शवविच्छेदन गृहापर्यंत पोहचविले आहेत.
आजमितीला ४0 वर्ष वय असलेल्या घनश्याम गावंडे यांचे प्राथमिक ते पदव्युत्तर पदविपर्यंतचे शिक्षण गावातच झाले. शिवाजी हायस्कूल व श्रीमती साळूंकाबाई राउत या विद्यालयात घनश्यामने शिक्षणाचे धडे गिरविले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना एन. सी. सी. व एन. एस. एस. मध्ये सहभागी होउन घनश्याम गावंडेंनी गुरुंकडून कौतूकाची थाप मिळविली. त्यावेळी साळूंकाबाई राउत महाविद्यालयाचे प्राचार्य असलेले भा. वा. चौखंडे यांच्या समाजसेवी कार्यामुळे प्रेरीत झालेल्या घनश्यामच्या मनात समाजसेवेची गोडी निर्माण झाली. घेत असलेल्या शिक्षणाच्या माध्यमातून छोटीमोठी नोकरी मिळवून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवायचा व जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा गरजवंताच्या मदतीला धावून जायचा निश्‍चय ज्ञानाचे धडे गिरवीताना घनश्यामने केला. परंतू कला शाखेची पदव्युत्तर पदवी घेवूनही घनश्यामच्या पदरी नोकरिच्या बाबतीत निराशाच आली. तरीही खचून न जाता २00७ मध्ये कुटूंबाची उपजिविका भागविण्यासाठी वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज घेत ऑटो घेतला. वनोजा ते शेलूबाजार या महत्वाच्या बाजारपेठेपर्यंत प्रवाशी ने आण करुन त्यातून कुटूंबाचा उदरनिर्वाह भागविण्याचे काम सुरु केले. बेताच्या परिस्थीतीतही महाविद्यालयीन काळात गुरुच्या प्रेरणेतून समाजकार्याचा घेतलेला वसा जपण्यासाठी सुरु असलेल्या व्यवसायातून काही करता येवू शकते का याची चाचपणी सुरु केली. त्यावेळी ऑटो चालविण्यामुळे कायम रस्त्याशी नाळ जूळलेल्या घनश्याम गावंडेंना कुणी अपघातात मृत्यूमुखी पडल्यास त्याचे शव शविविच्छेदन गृहापर्यंंत नेण्यासाठी कुणी पुढे येण्याचे धाडस करीत नसल्याची बाब त्याच्या लक्षात आली. हे पाहून घनश्यामने २00८ साली अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचे शव शवविच्छेदन गृहापर्यंत पोहचविण्याचा वसा घेतला. शेलूबाजार हे नागपूर-औरंगाबाद एक्सप्रेस महामार्गावरील महत्वपूर्ण गावं. अकोला, वाशिम, मंगरुळपीर या महत्वाच्या शहराला जोडणारे रस्तेही शेलूबाजारमधूनच जातात. त्यामुळे सहाजीकच परिसरातील या प्रमुख मार्गावर अपघात हे नित्याचेच. त्यामुळे घेतलेल्या वस्याप्रमाणे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. यासाठी लागणारा खर्च जो दे उसका भी भला.. जो ना दे उसका भी भला.. तत्वानुसार आपली समाजसेवेची भूक भागविण्यासाठी घनश्याम गावंडे गत सहा वर्षापासून अविरत करत आहेत. पोलिसांनी कळवो अथवा कुणीही कळवो घटनास्थळ गाठायचे अन् मृतकाचे शव मंगरुळपीरच्या ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन गृहापर्यंंत पोहचविण्याचे काम त्याने सुरु केले. हे करत असताना घटनास्थळी पोलिसांना शव उचलण्यासह काढण्यासह अपघातग्रस्तांना मदत पोहचविण्याचे काम गावंडे तातडीने करतात. गत सहा वर्षात शेलूबाजार परिसरात झालेल्या विविध अपघातातील ५१ मृतकांचे शव मंगरुळपीरच्या शवविच्छेदन गृहापर्यंंत पोहचविण्याचे काम गावंडेंनी केले. सहा वर्षातील गावंडेंच्या या सेवाकार्यामुळे ते आपदग्रस्तांचे मददगार म्हणून परिचित झाले आहेत. परिसरात कुठेही अपघात झाला कि त्याची खबर पोलिस वा कुणीही गावंडेंना देणार अन् गावंडे घटनास्थळ गाठून मदत करणार यात शंका नाही. गेल्या सहा वर्षापासून पोलिसांची एवढी मदत गावंडे करीत असतांना त्यांना पोलिसांकडून आजतागायत सन्मानीत करण्याचे औदार्य दाखविले नाही हे विशेष.

** विविध अपघातातील ५१ मृतकाचे शव सेवाभावी वृत्तीने मंगरुळपीरच्या शवविच्छेदन गृहापर्यंंत पोहचविणार्‍या घनश्याम गावंडेंनी आजवर ३0 वेळा रक्तदान केले आहे. सोबतच लाठीजवळ अपघातात मृत आढळलेल्या एका बेवारस व्यक्तीच्या अंत्यविधीला ५0१ रुपयांची मदत देण्याचे कामही घनश्याम गावंडे यांनी केले आहे.

Web Title: So far 51 ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.