अनंत वानखडे
बाळापूर: निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय दरवर्षी तोट्याचा ठरत आहे. त्यामुळे अनेक युवा शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध उत्पादनाचा व्यवसायकडे वळले आहेत. मात्र, या व्यवसायतही अडचणी पाठ सोडायला तयार नसल्याने चित्र आहे. माणसाच्या खाद्यपेक्षा गुरांच्या वैराणाचा खर्च महागला आहे. गव्हापेक्षा सरकी ढेप महाग झाल्याने दूध उत्पादकांची आर्थिककोंडी निर्माण झाली आहे.
बाळापूर तालुक्यात अनेक गावांमध्ये शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध उत्पादनाचा व्यवसाय करतात. वाढलेल्या महागाईमुळे दुग्ध व्यवसाय संकटात सापडला आहे. ग्रामीण भागात दुधाला अल्प भाव मिळत आहे. उत्पादन खर्च वाढल्याने दुग्ध व्यावसायिक संकटात सापडले आहेत.
जोडधंदा म्हणून अनेक छोट्या-मोठ्या शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाला पसंती दिली आहे. कारण शेतकऱ्यांना गुराकरिता चारा पाणी त्यांच्या निवासाची व्यावस्था करणे काही कठीण जात नाही. सर्वसाधारण दूध उत्पादकांकडे आजही पन्नास लीटरच्या जवळपास दूध सर्रास उपलब्ध आहे. मात्र, येथेही शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठेपले आहे.
उत्पादन खर्च आणि उत्पादनातून मिळणारी रक्कम यात दिवसेंदिवस मोठे अंतर पडत चालले आहे. सद्यस्थितीत माणसाला लागणारे खाद्य म्हणजे गव्हाची किंमत पतवारीपासून १८ ते २४ रुपये किलो आहे, तर गुरांची वैरण म्हणजे सरकी ढेप प्रतवारी पाहून २५ ते ३० रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे, तसेच सुग्रास, शेंगदाणा ढेप, मका तूर, हरभरा उडीद, मूग, चुन्नी, व गव्हाचे चोखर आदींच्या दरातही वाढ झाली आहे, शिवाय कॅल्शिअम, मिनरल पावडर आदींच्या किमतीही पूर्वीपेक्षा वाढल्या आहेत.
--------------------------------------------------------
जोडधंदा करू पाहणाऱ्यांसमोर अडचण
महागाईमुळे जोडधंदा म्हणून दूध उत्पादनाचा व्यवसाय करू पाहणाऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. वाढलेल्या गुरांच्या वैरणाच्या भावामुळे दुग्ध उत्पादक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी दुग्ध व्यावसायिकांकडून होत आहे.
-------------------------------------------
सध्या गुरांच्या वैरणाचे दर वाढल्याने आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. गुरांना खाद्य द्यावेच लागते, अन्यथा गुरांचे दूध कमी होऊन व्यवसायावर परिणाम होते. परिणामी, उत्पादन खर्च वाढत आहे. दुधाचे दर वाढल्यास काहीसा दिलासा मिळेल.
- अनंता गजानन वानखडे, बटवाडी खु. ता. बळापूर