सिरस्कारांनी ‘घड्याळ’ काढले, हाती कमळ घेतले! भाजपमध्ये प्रवेश निश्चित, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट
By राजेश शेगोकार | Updated: August 11, 2022 22:32 IST2022-08-11T22:30:01+5:302022-08-11T22:32:13+5:30
BJP News: आमदार बळिराम सिरस्कार यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काॅंंग्रेसचे घड्याळ हाती बांधले हाेते, अवघ्या दाेन वर्षांत त्यांनी ‘घड्याळ’ साेडून भाजपचे ‘कमळ’ हाती घेण्याचे निश्चित केले आहे.

सिरस्कारांनी ‘घड्याळ’ काढले, हाती कमळ घेतले! भाजपमध्ये प्रवेश निश्चित, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट
- राजेश शेगाेकार
अकाेला - भारिप बमसंमधून राजकीय कारकिर्द सुरू करत दाेन वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केलेल्या माजी आमदार बळिराम सिरस्कार यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काॅंंग्रेसचे घड्याळ हाती बांधले हाेते, अवघ्या दाेन वर्षांत त्यांनी ‘घड्याळ’ साेडून भाजपचे ‘कमळ’ हाती घेण्याचे निश्चित केले आहे. गुरुवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरवला असून, येत्या २० ऑगस्ट राेजी ते रीतसर प्रवेश घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बाळापूर विधानसभा मतदारसंघ या कर्मभूमीतून बळिराम सिरस्कार यांनी जिल्हा परिषद सदस्य, जि.प. अध्यक्ष व दाेन वेळा आमदार अशी राजकारणाची चढती पायरी गाठली. २०१९ च्या लाेकसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने बुलडाणा लाेकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली. मात्र त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीनंतर त्यांना पुन्हा बाळापूरची उमेदवारी मिळेल, असे मानले जात असताना त्यांना उमेदवारी नाकारून भारिपने राजकीय धक्का दिला हाेता.
या धक्क्यातून सावरत त्यांनी भारिप बमसंला साेडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. गेल्या दाेन वर्षांपासून ते राष्ट्रवादी कार्यरत हाेते. मात्र राज्यातील सत्ता समीकरणे बदलताच त्यांनी आता भाजपाचा मार्ग धरला आहे. गेल्या दाेन महिन्यांपासून त्यांची याबाबत जिल्हास्तरावर चर्चा सुरू हाेती. माजी नगरसेवक जयंत मसने, राजेश भेले, हिरासिंग राठाेड, सचिन काेकाटे, आदींच्या माध्यमातून भाजपचे जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी पक्षप्रवेशाचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. येत्या २० ऑगस्ट राेजी त्यांचा रीतसर प्रवेश हाेणार असून याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाेबत गुरुवारी चर्चा झाली. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रणधीर सावरकर, कमल सुरेका, सचिन काेकाटे, आदी उपस्थित हाेते. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटावे याकरिता सातत्याने मी प्रयत्न करत आलाे आहे. माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच मी हा निर्णय घेतला आहे, असे सिरस्कार यांनी ‘लाेकमत’ला सांगितले.
सिरस्कार यांच्या प्रवेशापूर्वी बाळापूर मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. आमच्या सर्व आमदारांनी त्यांच्या प्रवेशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. गुरुवारी उपमुख्यमंत्र्यांसाेबत भेट व चर्चा झाली. बाळापूर मतदारसंघात भाजपची ताकद आणखी वाढेल हा विश्वास आहे
- आ. रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष, भाजप