सहा जिल्ह्यांमध्ये १६ हजारावर सिंचन विहिरींची कामे रखडली
By Admin | Updated: November 13, 2014 23:43 IST2014-11-13T23:43:39+5:302014-11-13T23:43:39+5:30
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये सिंचनाचे क्षेत्र वाढणार कसे?

सहा जिल्ह्यांमध्ये १६ हजारावर सिंचन विहिरींची कामे रखडली
संतोष येलकर/अकोला
धडक सिंचन विहिर योजना आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींचा धडक कार्यक्रम शासनामार्फत राबविण्यात येत असला तरी; अमरावती विभागातील पाच जिल्हे आणि वर्धा, अशा एकूण जिल्ह्यांमध्ये १६ हजार ३७८ सिंचन विहिरींची कामे अद्याप सुरुच झाली नाहीत. हजारो सिंचन विहिरींची कामे बाकी असताना शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये सिंचनाचे क्षेत्र वाढणार कसे, असा प्रश्न निर्माण होत आहे.
विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त अमरावती विभागातील अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या पाच जिल्ह्यांसह वर्धा जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी सन २00९ पासून शासनामार्फत धडक सिंचन विहिर योजना सुरु करण्यात आली. या सहा जिल्ह्यांमध्ये प्रत्येक तालुक्यात १ हजार ३00 सिंचन विहिरींची कामे करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. त्यासाठी शासनामार्फत कोट्यवधी रूपयांचा निधीदेखिल उपलब्ध करुन देण्यात आला; मात्र गेल्या पाच वर्षात धडक सिंचन विहिर योजनेंतर्गत सिंचन विहिरींच्या कामांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले नाही. दरम्यान, धडक सिंचन विहिर योजनेंतर्गत रखडलेल्या विहिरींपैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अल्पभुधारक शेतकरी लाभार्थ्यांच्या सिंचन विहिरींचा समावेश गत फेब्रुवारीपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात आला. सिंचन विहिरींच्या कामांसाठी लाभार्थी शेतकर्यांना धडक सिंचन विहिर योजनेंतर्गत प्रत्येकी २ लाख ५0 हजार रूपये, तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येकी ३ लाखांचे अनुदान दिले जाते. सिंचन विहिरींच्या कामांसाठी निधीची कमतरता नसतानाही, शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबरअखेरपर्यंत धडक सिंचन विहिर योजनेंतर्गत ३ हजार ३२६ आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत १३ हजार ५२ सिंचन विहिरींची कामे प्रलंबीत होती. कामाची हिच स्थिती राहीली तर, शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये सिंचनाचे क्षेत्र कसे वाढणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.
विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये सिंचनाच्या क्षेत्रात वाढ व्हावी, यासाठी शासनामार्फत धडक सिंचन आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींचा कार्यक्रम विविध यंत्रणांमार्फत राबविण्यात येत आहे. सिंचन विहिरींची प्रलंबित असलेली कामे तातडीने सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे रोजगारहमी योजनेचे विभागीय उपायुक्त एस.टी.टाकसाळे यांनी स्पष्ट केले.
योजना व जिल्हानिहाय प्रलंबित सिंचन विहिरींची कामे!
जिल्हा धडक सिंचन योजना मग्रारोहयो
अमरावती ५५0 ३७३३
अकोला ३१५ २४३९
यवतमाळ १८१९ ३१५५
बुलडाणा ११0 २४३२
वाशिम ४१६ १२९३
वर्धा ११६ ११६0
.......................................
एकूण ३३२६ १३0५२