काँग्रेस-भाजपामध्ये तुल्यबळ लढतीचे संकेत

By Admin | Updated: August 25, 2014 02:25 IST2014-08-25T02:06:45+5:302014-08-25T02:25:40+5:30

खामगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये तुल्यबळ लढतीचे संकेत प्राप्त होत आहेत.

Signals of a match in Congress-BJP | काँग्रेस-भाजपामध्ये तुल्यबळ लढतीचे संकेत

काँग्रेस-भाजपामध्ये तुल्यबळ लढतीचे संकेत

अनिल गवई / खामगाव
जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या खामगाव विधानसभा मतदारसंघात २0१४ च्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये तुल्यबळ लढतीचे संकेत प्राप्त होत आहेत. गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या माध्यमातून काँग्रेसने भाजप-सेना युतीला चारीमुंड्या चीत केले आहे. आमदार सानंदा यांच्या विजयी घोडदौडीमुळे भाजपचे बलाढय़ नेते आ. भाऊसाहेब फुंडकर या मतदारसंघात चांगलेच हतबल झाले आहेत. आता मोदी लाटेवर स्वार होत भाजप-सेना महायुतीने मतदारसंघ ताब्यात घेण्याचे स्वप्नं रंगविले आहे, त्यामुळे भाजपाला आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्यासह भारिप बहुजन महासंघासोबतही लढत द्यावी लागणार असून, ही लढत तुल्यबळ होईल.
खामगाव मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षांंपासून आमदार दिलीपकुमार सानंदा यांचे एकछत्री वर्चस्व आहे. काँग्रेस पक्षाकडे आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्यासारखा सक्षम उमेदवार कुणीही नाही. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसकडून आमदार सानंदा यांचे तिकीट निश्‍चित मानले जात आहे. दुसरीकडे भाजप उमेदवारांच्या मुलाखती आटोपल्या आहेत. भारतीय जनता पक्षाकडून अँड. आकाश फुंडकर, उद्योजक संतोषसेठ डिडवाणी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. भाजपाला तीनदा पराभव पत्करावा लागल्यामुळे यंदा माजी विरोधी पक्षनेते आ. भाऊसाहेब फुंडकर यांनी प्रत्यक्ष रिंगणात उतरविण्याची रणनीती भाजपच्या प्रदेश स्तरावरील नेत्यांची आहे. या पृष्ठभूमीवर खामगाव मतदारसंघात आ. भाऊसाहेब फुंडकर यांच्याशी होणारी लढत ही राजकीय प्रतिष्ठेची होणार आहे.
लोकसभेतील मोदी त्सुनामीचा फायदा घेण्यासाठी ऐनवेळी अँड. आकाश फुंडकर यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. या निवडणुकीत भारिप बहुजन महासंघानेही अशोक सोनोने यांच्या रूपाने पुन्हा आव्हान देण्याची तयारी चालविली आहे. सोबतच मुस्लीम लीगचे दिलशाद पहेलवान यांनीही निवडणुकीची रणनीती आखली आहे.
काँग्रेसकडून आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्यासोबतच एनएसयूआयचे तेजेंद्रसिंह चौहान आणि महिला काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्ष तब्बसुम हुसेन यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले आहेत. मात्र, आमदार सानंदा यांचे तिकीट कापणे दोघांनाही शक्य नाही. त्यामुळे विजयाचा चौकार ठोकण्यासाठी आमदार सानंदा नव्या दमाने भिडले असल्याचे चित्र मतदारसंघात आहे; मात्र मोदी लाटेमुळे कोणतीही रिक्स घेण्यात ते तयार नाहीत. विधानसभा निवडणुकीपूर्वी खामगाव विधानसभा मतदारसंघात जातीय समीकरण डोळ्यासमोर ठेवत त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, उपसरपंच पदाचा खांदेपालट केला आहे. त्यामुळेच होणारी लढत तुल्यबळच होईल. त्यादृष्टीने प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रमुख उमेदवारांनी वरिष्ठांकडे उमेदवारीसाठी पाठपुरावा सुरू केला आहे. त्यामुळे मुंबईच्या चकरा वाढलेल्या दिसून येत आहे.

*महायुतीची उमेदवारी फुंडकर कुटुंबीयांकडेच!
विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना, रिपाइं महायुतीच्या उमेदवारीसाठी आ. भाऊसाहेब फुंडकर, अँड. आकाश फुंडकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तथापि, दोघांपैकी कुणाचीही उमेदवारी जाहीर झाल्यास फुंडकर पिता-पुत्रांपैकी एकालाच उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा मतदारसंघात आहे. या दोघांपैकी कुणीही रिंगणात राहिले तरी खरा सामना हा दोन आमदारांचा आहे.

Web Title: Signals of a match in Congress-BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.