'श्रीं'ना रजतनगरीचा श्रध्देचा निरोप
By Admin | Updated: August 2, 2014 23:42 IST2014-08-02T23:42:07+5:302014-08-02T23:42:07+5:30
पहाटेपासून विदर्भ माऊलींच्या माहेराचे वेध

'श्रीं'ना रजतनगरीचा श्रध्देचा निरोप
खामगाव: भाळी कुंकुंम टिळा..मुखी हरीनाम.. कंठी तुळशी माळ असलेल्या शेकडो वैष्णवांना आज पहाटेपासून विदर्भ माऊलींच्या माहेराचे वेध लागले होते. रजतनगरीतील एक दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर विदर्भ माऊलीने शेगावकडे प्रस्थान केले. परतीच्या प्रवासाला निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीला आज हजारो भाविकांनी श्रध्देंचा निरोप दिला. त्यामुळे खामगाव ते शेगाव या पायदळ वारीच्या मार्गावर आज संत गजानन भक्तांचा मळा फुलला होता. नाम घेता चला आता पंढरीची वाट..चालली दिंडी पंढरीला हो पंढरीला या ओळी गुणगुणत संत गजानन महाराजांच्या पालखीने ७ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान केले होते. या पालखीत अश्व आणि मेणा, धर्मध्वज आणि धर्मदंड सोबत असलेले वैष्णव, साडेपाचशे वारकरी, श्रींचा रजत मुखवटा असलेल्या विशेष रथाचा समावेश होता. एक महिन्याचा प्रवास करून आषाढी एकादशीला शेगावीच्या राणाने महाराष्ट्राचे आराध्यदैवत पांडुरंगाचे दर्शन घेतले. त्यानंतर ही पालखी विदर्भ पंढरीकडे निघाली. वाटेत ठिकठिकाणी मुक्काम घेत, शुक्रवारी रजतनगरीत दाखल झाली. त्यानंतर शनिवारी पहाटेच शेगावकडे रवाना झाली. श्रींना श्रध्देचा निरोप देण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून रजतनगरी सज्ज झाली होती. यामध्ये आदर्श मंडळ, महाराजा मसाला उद्योग, नंद टॉवर, स्व. योगेश बायस्कर मित्र मंडळ, तिरूपती सेवा ग्रुप, कॉटनमार्केट ग्रुप, महालक्ष्मी ज्वेलर्स, हर्षल अंलकार, मारोती संस्थान, जयपूर, जय गजानन मित्र मंडळ, शरद जयस्वाल शेगाव, एन.व्ही चिन्मय विद्यालय, राजे छत्रपती ऑटो स्टॉप, जय गजानन ग्रुप, जय गजानन मित्र मंडळ गजानन ऑईल ग्रुप ऑफ इंडस्ट्रिज, संत गजानन मित्र मंडळ चिंचोली, यश ढाबा, मोरे ज्वेलर्स, सवर्णा गावकरी मंडळ, माऊली कॉलेज, सिद्धीविनायक कॉलेजसह शेगावपर्यंत ठिकठिकाणी चहा, नास्ता, फराळ, केळी, लाडू, केसरदूध आदी साहित्याचे वितरण केले. दरम्यान संत गजानन महाराजांच्या पालखीत आज राजकारणीही वारकरी बनल्याचे चित्र दिसून आले. खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय कुटे, आमदार विजयराज शिंदे, जिल्हा परिषद बांधकाम सभापती बलदेवराव चोपडे, महिला बाल कल्याण सभापती सायलीताई सावजी, भारिपचे जिल्हाध्यक्ष अशोक सोनोने यांनीही शेगाव पायदळ वारी केली.
** गर्दीचा उच्चांक गेल्या काही वर्षांपासून संत गजानन महाराजांच्या पालखी सोबत जाणार्या भाविकांच्या गर्दीत लक्षणिय भर पडत आहे. यंदा च्या गर्दीने आतापर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत नवा विक्रम प्रस्थापित केला. या वारीत आबाल वृध्दांची लक्षणीय वाढ होत असल्याने वारीमार्गही अपुरा पडत असल्याचे चित्र आज पहिल्यांदा पहायला मिळाले. रस्त्यावरील गर्दी वाढल्यामुळे असंख्य भाविक वारी मार्गाच्या लगत असलेल्या शेतातून, समांतर जागेतून मार्ग काढीत संत नगरीत दाखल झाले.
** बोबडे कॉलनीजवळ काँग्रेसकडून स्वागत संत गजानन महाराजांच्या पालखीचे आमदार दिलीपकुमार सानंदा, नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा, जिल्हा परिषद अध्यक्षा वर्षाताई वनारे, सदानंद धनोकार, सुरेश वनारे यांच्यावतीने आज पहाटेच बोबडे कॉलनीजवळ स्वागत करण्यात आले.