‘बीडीओं’ना कारणे दाखवा नोटिस
By Admin | Updated: May 27, 2017 00:55 IST2017-05-27T00:55:57+5:302017-05-27T00:55:57+5:30
लेखा परीक्षणास ग्रामपंचायतींचे अभिलेखे देण्यात दिरंगाई!

‘बीडीओं’ना कारणे दाखवा नोटिस
संतोश येलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: ग्रामपंचायतींच्या निधीचे अभिलेखे लेखा परीक्षणास उपलब्ध करून देण्यात आले नसल्याने, यासंदर्भात अनुपालन अहवाल सादर करण्याच्या कामात दिरंगाई केल्यामुळे जिल्ह्यातील सातही पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांना (बीडीओ) जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (सीईओ) कारणे दाखवा नोटिस बजावली आहे.
लेखा परीक्षणासाठी जिल्ह्यातील २१३ ग्रामपंचायतींकडून ग्रामपंचायत अभिलेखे, सामान्य निधी व अन्य निधीचे अभिलेखे उपलब्ध करून देण्यात आले नाही. यासंदर्भात सन २०११-१२ मध्ये पंचायत राज समितीने आक्षेप नोंदविला होता. या पृष्ठभूमीवर योजनानिहाय ग्रामपंचायतींच्या सामान्य निधी, जवाहर रोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना तसेच संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनासंबंधी सद्यस्थितीचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनामार्फत जिल्ह्यातील सातही पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांना (बीडीओ) देण्यात आले होते. वारंवार निर्देश देण्यात आल्यानंतर अद्यापही ‘बीडीओं’कडून अनुपालन प्राप्त झाले नाही. एवढेच नाही तर जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतींच्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांकडून लेखा परीक्षणासाठी ग्रामपंचायत अभिलेखे अद्यापही उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यानुषंगाने लेखा परीक्षणासाठी ग्रामपंचायतींची अभिलेखे उपलब्ध करून न देणे आणि यासंदर्भात अनुपालन अहवाल सादर करण्याच्या कामात जिल्ह्यातील सातही पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांनी दिरंगाई केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुहे यासंदर्भात नियम १९७९ नुसार शिस्तभंगविषयक कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटिस जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी गत ११ मे रोजी जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांना बजावली आहे. नोटिस मिळाल्यानंतर तातडीने स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेशही नोटिसमध्ये देण्यात आला आहे.
लेखा परीक्षणासाठी अद्यापही अभिलेखे न दिलेल्या अशा आहेत ग्रामपंचायती!
लेखा परीक्षणासाठी जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतींंच्या ग्रामसेवकांकडून अद्यापही अभिलेखे उपलब्ध करून दिले नाही. त्यामध्ये दुधाळा, कौलखेड जहागीर, कंचनपूर, शिवणी, लोणाग्रा, धामणा, चिखलगाव, कापशी, रिधोरा, दधम, बारलिंगा, जोगलखेड, मनारखेड, खामखेड, खिरपुरी खुर्द, जलालाबाद, भेंडीसूत्रक, खेर्डा, वडगाव, जामवसू, बोर्टा, लोणसना, शेलू नजीक, दातवी, विरवाडा, कवठा सोपीनाथ, निंभा, कंझरा, शेकापूर,गावंडगाव, सिरसोली व शिवाजी नगर (तेल्हारा) इत्यादी ग्रामपंचायतींच्या संबंधित ग्रामसेवकांकडून लेखा परीक्षणासाठी अभिलेखे उपलब्ध करून देण्यात आले नाही.
लेखा परीक्षणासाठी ग्रामपंचायतींची अभिलेखे उपलब्ध करून देण्यात आली नाही आणि यासंदर्भात अनुपालन अहवाल सादर करण्याच्या कामात दिरंगाई केल्याने, जिल्ह्यातील सातही पंचायत समितींच्या ‘बीडीओं’ना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली असून, तातडीने स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. स्पष्टीकरण समाधानकारक प्राप्त न झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
- डॉ. सुभाष पवार
प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद