भररस्त्यात थाटली जाताहेत दुकाने
By Admin | Updated: November 10, 2014 01:21 IST2014-11-10T01:21:03+5:302014-11-10T01:21:03+5:30
अकोला शहरातील वास्तव, वाहतुकीची कोंडी : किराणा बाजारातील व्यावसायिक त्रस्त.

भररस्त्यात थाटली जाताहेत दुकाने
अकोला : किराणा बाजारात भररस्त्यातच किरकोळ नवीन आणि जुन्या वस्तूंच्या विक्रीची दुकाने थाटल्या जात असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच रस्त्यावरच दुकाने थाटण्यात येत असल्याने किराणा बाजारातील व्यावसायिक त्रस्त झाले आहेत.
किराणा-कोठडी बाजारात रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. बाजारात विदर्भातील व्यापारीही येतात. मात्र, बाजारात रविवारी रस्त्याच्या दुतर्फा हातगाड्यांवर नवीन आणि जुन्या साहित्याच्या विक्रीची दुकाने थाटण्यात येतात. ही दुकाने किराणा व्यावसायिकांच्या दुकानांसमारेच थाटण्यात येतात. काही जण तर रस्त्यावरच दुकाने थाटतात. त्यामुळे कॉटन मार्केट पोलिस चौकीकडून कोठारी बाजार आणि कापड बाजार चौकाकडून ताजनापेठ चौकाकडे जाणार्या मार्गावरील वाहतुकीची कोंडी होत आहे. वाहतुकीची कोंडी होत असल्याने अनेक वेळा वाहन चालकांमध्ये वाद होतात. काही वेळा तर वादाचे पर्यवसान हाणमारीतही होते. रस्त्यावर दुकाने थाटण्यात येऊ नये, यावर पोलिस आणि महापालिकेने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी किराणा व्यावसायिकांमधून होत आहे.
*या वस्तूंची होते विक्री
किराणा बाजारात भररस्त्यातच रविवारी सकाळीच हातगाडीवर दुकाने थाटण्यात येतात. या ठिकाणी चप्पल-बूट, तयार कपडे, जुन्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, लहान मुलांची जुनी खेळणी व गृहोपयोगी वस्तूंची विक्री करण्यात येते.
*असामाजिक तत्त्वांचा वावर
किराणा बाजारात भररस्त्यावरच साहित्याची विक्री होते. या ठिकाणी चोरटे सक्रिय असतात. वस्तू खरेदीसाठी ग्रामीण भागातून आलेल्या ग्राहकांच्या खिशांवर चोरटे हात साफ करतात. तसेच काही वेळा किराणा दुकानांमध्येही चोरीचा प्रयत्न होतो.