धक्कादायक! मुलाची मानच कापली, कमला नेहरू नगरात हत्या
By नितिन गव्हाळे | Updated: May 26, 2023 10:30 IST2023-05-26T09:41:34+5:302023-05-26T10:30:12+5:30
पोलीस मुख्यालयासमोर असलेल्या कमला नेहरू नगरात गुरुवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास मुलाच्या हत्येचा थरार घडला.

धक्कादायक! मुलाची मानच कापली, कमला नेहरू नगरात हत्या
अकोला: पोलीस मुख्यालयासमोर असलेल्या कमला नेहरू नगरात गुरुवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास मुलाच्या हत्येचा थरार घडला. धारदार चाकूने मुलाची मान कापून धड वेगळे करण्यात आले. या प्रकरणात रात्री उशिरा सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे अकोल्यात हे चाललंय तरी काय असा प्रश्न नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहन रणधीर सोळंके वय वर्ष 16 त्याच्या डोक्यावर व मानेवर चाकूने सपासप वार करून त्याची मान धडा वेगळी करण्यात आली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रोहनचा जागीच मृत्यू झाला. रोहनची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून प्रसार झाला असून सिटी कोतवाली पोलीस त्याचा शोध घेत आहेत ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे घडली याचा तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्यासह सिटी कोतवाली चे ठाणेदार चंद्रशेखर कडू पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला.
एका मागून एक हत्यांचे सत्र
अकोला शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्राण घातले व हत्यांचे सत्र घडत आहेत. त्यामुळे अकोल्यात हे चाललंय तरी काय? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. न्यू तापडिया नगर चिखलपुरा व कृषी नगरातील हत्याकांडानंतर आता कमला नेहरू नगरात सुद्धा युवकाची हत्या करण्यात आली. 23 मे रोजी बस स्थानकालगत एका व्यवसाय का वर सुद्धा प्राण घातक हल्ला करण्यात आला. सातत्याने घडत असलेल्या घटनांवरून अकोला पोलिसांचे गुन्हेगारांवरील व कायदा सुव्यवस्थेवरील नियंत्रण सुटत असल्याचे अधोरेखित होत आहे.