कृषीविद्यापीठात ५ नोव्हेंबरपासून तीन दिवस शिवारफेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 12:32 IST2019-11-02T12:32:39+5:302019-11-02T12:32:45+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ५ ते ७ नोव्हेंबरपर्यंत शिवारफेरीचे आयोजन केले आहे.

कृषीविद्यापीठात ५ नोव्हेंबरपासून तीन दिवस शिवारफेरी
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विकसित नवे संशोधन, कृषी तंत्रज्ञान बघून या तंत्रज्ञानाचा शेतावर अवलंब करू न कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घ्यावे, यासाठीची परिपूर्ण माहिती देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ५ ते ७ नोव्हेंबरपर्यंत शिवारफेरीचे आयोजन केले आहे.
विस्तार शिक्षण संचालनालयाद्वारे आयोजित शिवारफेरीचे उद्घाटन मंगळवार, ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता शेतकरी सदन येथे होईल. तीन दिवसीय शिवारफेरीत प्रत्यक्ष शेतशिवार बघण्याचा कार्यक्रम असून, दुपारी ४ ते ५ वाजतापर्यंत डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात चर्चासत्र होणार आहे. या चर्चासत्रात शेतकऱ्यांच्या शेती, संशोधन व तंत्रज्ञानासंदर्भातील शंकांचे निरसन केले जाणार आहे. ५ नोव्हेंबर रोजी अकोला, बुलडाणा, वाशिम व अमरावती या चार जिल्ह्यांतील शेतकरी शिवारफेरीत सहभागी होणार असून, ६ नोव्हेंबर रोजी चंद्रपूर, नागपूर, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. ७ नोव्हेंबर रोजी यवतमाळ, वर्धा व गडचिरोली जिल्ह्यांतील शेतकरी सहभागी होणार आहेत. तसे नियोजन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केले आहे. शेतकºयांना पूर्वसूचना देण्यासाठी १८००२३३०७२४ या क्रमांकवर नि:शुल्क संपर्क साधता येणार आहे.
यावर्षी शेतकºयांना सेंद्रिय शेतीसंदर्भात माहिती देण्यात येणार आहे. तसेच उद्यान विद्या, कापूस संशोधन केंद्र, संशोधन प्रकल्प (फळे), ज्वारी संशोधन, कोरडवाहू शेती संशोधन, कडधान्य, तेलबिया संशोधन केंद्र, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय येथे अवजारे प्रदर्शन, नागार्जुन वनौषधी उद्यान व दुग्धशास्त्र विभाग येथील देशी गायी प्रकल्पांना भेटी देता येणार आहेत.
डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती केंद्र भेटी देऊन डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे जीवनचरित्र बघता येणार आहे. शेतकºयांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी कृषी विद्यापीठाचे नियोजन केले असून, विदर्भातील हजारो शेतकरी या शिवारफेरीत सहभागी होणार असल्याची माहिती विस्तार शिक्षण संचालक डॉ. दिलीप मानकर यांनी दिली.