शिवभक्तांनी केला तपेश्वरीला जलाभिषेक
By Admin | Updated: August 19, 2014 01:08 IST2014-08-19T00:52:15+5:302014-08-19T01:08:22+5:30
चौथ्या सोमवारी शेकडो शिवभक्तांनी पूर्णेचे पाणी कावडीने आणून ‘हर हर महादेव’च्या गजरात भवानीपुरा येथील तपेश्वरी मंदिरामध्ये महादेवाला जलाभिषेक केला.

शिवभक्तांनी केला तपेश्वरीला जलाभिषेक
आकोट : श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी शेकडो शिवभक्तांनी पूर्णेचे पाणी कावडीने आणून 'हर हर महादेव'च्या गजरात भवानीपुरा येथील तपेश्वरी मंदिरामध्ये महादेवाला जलाभिषेक केला. सकाळपासून अकोला नाका येथून कावडयात्रा मिरवणुकीला प्रारंभ झाला होता. शहारात ठिकठिकाणी या कावड यात्रेचे भाविकांनी स्वागत करून पूजन केले. कावड यात्रा उत्सवामधील भक्तिमय वातावरणाने आकोटनगरी दुमदुमली होती. रविवारला रात्री गेलेले शिवभक्त मंडळ गांधीग्राम येथून कावडीने पाणी घेऊन आकोटात दाखल झाले. शहरातील प्रमुख मार्गाने वाजतगाजत कावड यात्रा व शिवपालखी निघाली. शिवभक्तांनी शहरातील तळोकारपुरा भागातील तपेश्वरीला तर काही शिवभक्तांनी शहरातील नंदीपेठेतील नंदिकेश्वराला जलाभिषेक केला. कावडयात्रेत विविध प्रकारचे आकर्षक देखावे सादर करण्यात आले होते. काही मंडळांनी महादेवाची वेशभूषा करून शोभायात्रेचे आकर्षण वाढविले होते. विविध मंडळांनी आरोग्यविषयक तसेच एकतेचा संदेश देणारे फलक लावले होते. या कावडयात्रेत शिवभक्त मंडळ गणेश मंदिर आकोट, श्री पंचमुखी शिव भक्त मंडळ यात्राचौक, शिवभक्त मंडळ शनवारा ग्रुप, तपेश्वरी शिवभक्त मंडळ आकोट, नाथूबाबा ग्रुप आकोट, जय भवानी क्रीडा प्रसारक मंडळ रामटेकपुरा, श्रीराम व्यायामशाळा मोठे बारगण, हिंद नवयुवक मंडळ यात्रा चौक, जयशक्ती शिवशक्ती व्यायामशाळा दखनी फैल, नंदिकेश्वर व्यायाम शाळा नंदिपेठ, क्रांती ग्रुप महात्मा फुले चौक, भयानक क्रांती ग्रुप, वीर संग्राम मंडळ, सिंधू नवजवान शिवभक्त मंडळ, जय महाकाल शिवभक्त मंडळ, गणपती मंदिर कावड मंडळ, छावा शिवभक्त मंडळ, जय ग्वाला शिवभक्त मंडळ, मातंग समाज शिवभक्त मंडळ आदी एकूण २१ मंडळांनी शोभायात्रेत सहभाग घेतला होता. मिरवणुकीदरम्यान शहरातील विविध पक्षाच्या पदाधिकार्यांनी, महिला मंडळीने कावडयात्रेचे पूजन केले. मिरवणुकीच्या मार्गावर शिवभक्तांसाठी विविध संघटनांनी चहा, पाणी, फराळ, फळ, बासुंदी आदीची व्यवस्था केली होती. पालखी मिरवणूक पोलिस बंदोबस्तात शांततेत पार पडली.