शिवसेनेच्या जन आशीर्वाद यात्रेत पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 01:12 PM2019-08-30T13:12:12+5:302019-08-30T13:12:43+5:30

जिल्हाप्रमुख नितीन देशमुख व आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी एकमेकांच्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवल्यामुळे आगामी काळात गटबाजीचे मोठे आव्हान उभे ठाकणार आहे.

Shiv Sena's Jan Ashirwad Yatra ; diferences between party in Akola | शिवसेनेच्या जन आशीर्वाद यात्रेत पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

शिवसेनेच्या जन आशीर्वाद यात्रेत पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

googlenewsNext

अकोला: शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी उफाळून चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले. जिल्हाप्रमुख नितीन देशमुख व आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी एकमेकांच्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवल्यामुळे आगामी काळात गटबाजीचे मोठे आव्हान उभे ठाकणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला जिल्ह्यातील नेमका कोणता मतदार संघ येणार, या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून शिवसेनेमध्ये गटातटाच्या राजकारणाला ऊत आला आहे. गलीतगात्र झालेल्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाची सूत्रे स्वीकारल्यापासूनच जिल्हाप्रमुख नितीन देशमुख व आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यात बिनसल्याचे चित्र अनेकदा पहावयास मिळाले. गतवर्षी जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याहस्ते जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख तथा विद्यमान केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांची उपस्थिती असतानाही आ.गोपीकिशन बाजोरिया, युवासेना जिल्हाधिकारी विठ्ठल सरप व युवासेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. त्यावेळी आ.बाजोरिया यांनी थेट संपर्क प्रमुख अरविंद सावंत यांच्यावर टीकास्त्र सोडल्यामुळे पक्षात मोठा राजकीय धुराळा उठला होता. त्याच पद्धतीचे चित्र आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने पहावयास मिळाले आणि शिवसेनेत सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले.


आ.बाजोरियांच्या निवासस्थानी जिल्हाप्रमुख अनुपस्थित
‘पीडीकेव्ही’च्या सभागृहात सकाळी १०.३० वाजता आदित्य ठाकरे विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार होते. त्यापूर्वी आ.गोपीकिशन बाजोरिया यांच्या निवासस्थानी आदित्य ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले होते. याठिकाणी जिल्हाप्रमुख नितीन देशमुख व त्यांच्या गटाचे सर्व पदाधिकारी अनुपस्थित असल्याचे दिसून आले. ‘पीडीकेव्ही’च्या कार्यक्रमात मात्र जिल्हाप्रमुखांसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यादरम्यान, वाडेगाव येथील विजय संकल्प मेळाव्याकडे आ.बाजोरिया यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.


पक्ष नेतृत्वाकडून दखल
आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेत विद्यार्थ्यांसोबत संवाद आणि वाडेगाव येथील विजय संकल्प मेळाव्यात संबोधित करण्याच्या दोन विषयांचा समावेश होता. त्याव्यतिरिक्त पार पडलेल्या कार्यक्रमाची इत्थंभूत माहिती यात्रेच्या संयोजकांनी पक्ष स्तरावर सादर केली असून, त्याची पक्ष नेतृत्वाने दखल घेतल्याची माहिती आहे.


होर्डिंग्जवरून जिल्हाप्रमुख गायब
४शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आ.गोपीकिशन बाजोरिया, युवासेना जिल्हाधिकारी विठ्ठल सरप यांनी शहरात विविध ठिकाणी होर्डिंग्ज, बॅनर लावले आहेत. या होर्डिंग्जवर सेनेतील सर्व वरिष्ठ नेत्यांचे छायाचित्र असताना केवळ जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांचेच छायाचित्र नसल्याचे समोर आले. दुसरीकडे जिल्हाप्रमुखांच्या होर्डिंग्जवर आ.बाजोरियांचे छायाचित्र आढळून आले नाही.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा ‘पीडीकेव्ही’तील कार्यक्रम सुरू असतानाच नागपूर येथील नातेवाइकाचे निधन झाल्याची वार्ता मिळाली आणि कार्यक्रम मध्येच सोडून नागपूरसाठी रवाना झालो. त्यामुळे वाडेगाव येथील कार्यक्रमातही उपस्थित राहू शकलो नाही. पक्षांतर्गत कोणतेही मतभेद नाहीत.
-गोपीकिशन बाजोरिया, आमदार

वाडेगाव येथील विजय संकल्प मेळाव्याची तयारी करीत असल्याने इतर ठिकाणी जाणे शक्य झाले नाही. ‘पीडीकेव्ही’च्या कार्यक्रमातून थेट वाडेगाव गाठले. होर्डिंग्जच्या मुद्यावर तूर्तास बोलणे योग्य ठरणार नाही.
-नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख, शिवसेना.

Web Title: Shiv Sena's Jan Ashirwad Yatra ; diferences between party in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.