शिर्ला बुद्धभूमी धम्म प्रसाराचे केंद्र!
By Admin | Updated: May 13, 2014 22:23 IST2014-05-13T21:50:20+5:302014-05-13T22:23:03+5:30
एका धम्मकुटीच्या जागेवर उभ्या राहिलेल्या भव्य स्तुपाची जागा आज गौतम बुद्धांनी दिलेल्या धम्म संदेशाच्या प्रचार आणि प्रसाराचे केंद्र बनले आहे.

शिर्ला बुद्धभूमी धम्म प्रसाराचे केंद्र!
शिर्ला: एका धम्मकुटीच्या जागेवर उभ्या राहिलेल्या भव्य स्तुपाची जागा आज गौतम बुद्धांनी दिलेल्या धम्म संदेशाच्या प्रचार आणि प्रसाराचे केंद्र बनले आहे. पश्चिम विदर्भातील बौद्ध धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्ला येथील बुद्धभूमीला बुद्ध पौर्णिमेला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.
वत्सगुल्म नगरीचे राजा वाकाटक यांचे सचिव हरिसेन यांनी पातूरजवळच्या टेकड्यांवर तीन तोंडी आणि पाच तोंडी पाण्याचे टाके बांधले आहे. शिर्ला गावाच्या जवळ असलेल्या या परिसरात २00८ मध्ये भव्य बौद्ध स्तूप उभे राहिले. मंुबईतील चैत्यभूमी आणि नागपुरातील दीक्षाभूमीनंतर शिर्लाच्या बुद्धभूमीला बौद्ध धर्मीयांमध्ये श्रद्धास्थान म्हणून मान मिळत आहे.
शिर्ला येथे खडकाळ भागात काही वर्षांपूर्वी एक धम्मकुटी उभारण्यात आली होती. एका समाजकंटकाने या जागेचा गैरवापर सुरू केला. ही बाब चैत्यभूमीचे संस्थापक एन. बी. संघपाल यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी येथे सुरू असलेले गैरप्रकार थाबविले. गैरप्रकार करणार्यांना बाहेर काढले आणि पाच एकर जागेवर स्तूप निर्माण केले. आज तीच जागा बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसाराचे प्रमुख केंद्र बनले आहे. परिसरात खडकाळ भागातही वृक्ष लागवड करण्यात आली असून, स्तुपामध्ये भव्य बुद्ध मूर्ती स्थापन केली आहे. स्तुपाच्या बाहेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य मूर्ती लक्ष वेधून घेते.
भगवान गौतम बुद्धांच्या २५५८ व्या जयंतीनिमित्ताने शिर्ला येथील बुद्धभूमीत २५५८ पणत्यांचे प्रज्वलन मंगळवारी सायंकाळी करून बौद्ध बांधवांनी गौतम बुद्धांच्या मूर्तीचे दर्शन घेतले.