कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘शिक्षण सेतू अभियान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:21 IST2021-05-25T04:21:04+5:302021-05-25T04:21:04+5:30

अकोला : कोरोना विषाणूचा प्रचंड प्रमाणात वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेता चालू शैक्षणिक सत्राच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ...

‘Shikshan Setu Abhiyan’ for Ashram School students on the backdrop of Corona | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘शिक्षण सेतू अभियान’

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘शिक्षण सेतू अभियान’

अकोला : कोरोना विषाणूचा प्रचंड प्रमाणात वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेता चालू शैक्षणिक सत्राच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी गाव पातळीवर जाऊन त्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, शालेय पोषण आहाराचा पुरवठा करणे, यासह शिकवणी वर्गांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘शिक्षण सेतू अभियान’ राबविण्याचे निर्देश आदिवासी विकास विभागाने २४ मे रोजी जारी केले आहेत.

संसर्गजन्य कोरोना विषाणूमुळे मागील वर्षभरापासून शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय सुरू केला असता दुर्गम, अतिदुर्गम व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना मोबाइल कनेक्टिव्हिटीअभावी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागल्याचे समोर आले आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाचा वाढत चाललेला प्रादुर्भाव लक्षात घेता अशा परिस्थितीमध्ये शासकीय आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. बहुतांश विद्यार्थी त्यांच्या गावी परत गेले आहेत. कोरोना विषाणूचा हाहाकार लक्षात घेता चालू शैक्षणिक सत्रावरही संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, या उद्देशातून राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण सेतू अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहेत. याअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणाची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देणे, ती होत नसल्यास गावपातळीवर जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणे तसेच त्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, शालेय पोषण आहाराचा पुरवठा करणे यासह त्यांच्या खात्यामध्ये ‘डीबीटी’नुसार पैसे जमा करण्याचाही समावेश करण्यात आला आहे.

शासनाची करडी नजर

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कायम असेपर्यंत आदिवासी विद्यार्थ्यांकरिता 'शिक्षण सेतू अभियान' राबविण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा व शालेय पोषण आहाराचा पुरवठा केला जातो किंवा नाही यावर शासनाची करडी नजर असणार आहे.

Web Title: ‘Shikshan Setu Abhiyan’ for Ashram School students on the backdrop of Corona