‘शकुंतला’ धावणार ‘ब्रॉडगेज’वरून!
By Admin | Updated: June 24, 2017 05:30 IST2017-06-24T05:30:33+5:302017-06-24T05:30:33+5:30
राज्य शासनाकडून ४0 टक्के निधीस मंजुरी.

‘शकुंतला’ धावणार ‘ब्रॉडगेज’वरून!
वाशिम: मूर्तिजापूर ते यवतमाळ धावणार्या शकुंतला रेल्वेच्या ब्रॉडगेजकरिता ४0 टक्के निधीस राज्य शासनाने मंजुरी दर्शविली असून, लवकरच काम सुरू होणार असल्याची माहिती खासदार भावना गवळी यांनी शुक्रवारी दिली.
शकुंतलेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर व्हावे, यासाठी शासनस्तरावर सलग पाठपुरावा केला. त्याचेच फलित म्हणून २0१६-१७ च्या अंदाजपत्रकात २१00 कोटी रुपयांची तरतूद रेल्वे मंत्रालयामार्फत करण्यात आली. यासंदर्भात अधिक माहिती देताना खासदार गवळी यांनी सांगितले, की महाराष्ट्रामध्ये नवीन होणार्या रेल्वेमार्गाकरिता केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाचा ६0 टक्के वाटा आणि राज्य शासनाचा ४0 टक्के वाटा अशा प्रमाणात हा रेल्वे मार्ग पूर्णत्वास जाणार असून शंकुतलेच्या बाबतीत ४0 टक्के निधी देण्यास राज्य शासनाने मंजुरी दर्शविली आहे. यामुळे अचलपूरपासून यवतमाळपर्यंंंंत ११३ किमी अंतर असणार्या शकुंतलेच्या रेल्वेमार्गास आता वेग येणार असून, ब्रॉडगेजच्या रेल्वे मार्गाकरिता असणारी प्रक्रिया वेगाने होणार आहे, अशी माहिती खासदार गवळी यांनी दिली.