लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांची सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:18 IST2021-03-19T04:18:21+5:302021-03-19T04:18:21+5:30
भाजपच्या बूथ प्रमुखांना किटचे वाटप अकाेला: भारतीय जनता पक्ष पूर्व मंडळाच्या वतीने पूर्व मंडळाच्या बूथ प्रमुखांना मास्क, सॅनिटायझर व ...

लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांची सेवा
भाजपच्या बूथ प्रमुखांना किटचे वाटप
अकाेला: भारतीय जनता पक्ष पूर्व मंडळाच्या वतीने पूर्व मंडळाच्या बूथ प्रमुखांना मास्क, सॅनिटायझर व इतर उपयोगी वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. करोना काळात पक्षाने अनेक उपक्रम हाती घेतले होते. त्यामध्ये बुथ प्रमुखांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. याप्रसंगी आमदार रणधीर सावरकर यांनी बूथ प्रमुख भाजपच्या यशाचा प्रमुख शिलेदार असून भाजपचा कणा असल्याचे सांगितले.
शर्जिल उस्मानीवर कारवाइ करा!
अकाेला: पुणे येथे एल्गार पारिषदेच्या मंचावरून हिंदू धर्माबाबत आक्षेपजनक वक्तव्य करणाऱ्या शर्जील उस्मानीला पाठीशी घालणाऱ्या आघाडी सरकारचा भाजयुमो अकोला महानगर व ग्रामीणतर्फे स्थानिक ओपन थिएटर चौकात निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी भाजयुमाेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या विराेधात घाेषणाबाजी केली.
वीजपुरवठा खंडित करू नका!
अकाेला: अधिवेशन काळात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सभागृहात शेतकऱ्यांची वीज व स्थानिक स्वराज्य संस्थेची वीजपुरवठा खंडित करणार नाही, असे अभिवचन दिले हाेते. अधिवेशन संपताच शेतकरी, सर्वसामान्य नागरिक तसेच पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू झाली असून ही कारवाई बंद करण्याची मागणी भाजपच्यावतीने लाेकप्रतिनिधींनी केली आहे.
लसीकरण,चाचणीसाठी गर्दी
अकाेला: केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने ३ मार्चपासून ६० वर्षांवरील वयाेवृध्द नागरिक व दुर्धर आजारी असलेल्या ४५ वर्षांपेक्षा अधिक नागरिकांच्या लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. गुरुवारी मनपाच्या झाेन निहाय चाचणी केंद्रांमध्ये लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांची गर्दी केली हाेती. यावेळी नागरिकांना साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा विसर पडल्याचे दिसून आले आहे.
प्रवाशांची संख्या राेडावली
अकाेला: संसर्गजन्य काेराेनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून ताेंडाला मास्क लावणे, साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याची गरज आहे. गुरुवारी मध्यवर्ती बस स्थानकावर प्रवाशांची संख्या राेडावल्याचे दिसून आले. यावेळी प्रवाशांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे चित्र हाेते. यामुळे काेराेनाच्या प्रसाराला हातभार लागत आहे.
अतिक्रमकांच्या हातगाड्यांची ताेडफाेड
अकाेला: महापालिकेच्या सूचनांना केराची टाेपली दाखविणाऱ्या गांधी चाैक, जुना भाजी बाजार, खुले नाट्यगृह ते फतेह अली चाैकातील भाजी विक्रेता, फळ विक्रेत्यांसह इतर साहित्याची विक्री करणाऱ्या अतिक्रमकांच्या हातगाड्यांची गुरुवारी मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने ताेडफाेड केली. अतिक्रमणामुळे जठारपेठ चाैकात वाहतुकीची काेंडी हाेत असून अपघात घडतात.
लसीकरणासाठी नागरिकांचा पुढाकार
अकाेला: शहरात ६० वर्षांपेक्षा अधिक नागरिकांच्या लसीकरणाला ३ मार्चपासून प्रारंभ झाला आहे. सुरुवातीला लसीकरणासाठी आखडता हात घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी आता लसीकरणाला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. गुरुवारी मनपाच्या कस्तुरबा गांधी व भरतिया रुग्णालयात लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेतल्याचे दिसून आले.
सर्वेक्षणासाठी मनपा सरसावली
अकाेला: मागील काही दिवसांपासून शहरात पुन्हा एकदा काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत माेठी वाढ हाेत चालली आहे. काेराेनाचा प्रादुर्भाव पाहता सर्वेक्षणासाठी महापालिका प्रशासन सरसावल्याचे चित्र असून सर्वेक्षणाची माेहीम अंतिम टप्प्यात आहे. चाचणीदरम्यान पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या पाहता नागरिकांनी साेशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे झाले आहे.
काेराेनाचे नियम पायदळी
अकाेला: शहरात काेराेनाचा प्रसार झपाट्याने हाेत असून काेराेना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागरिकांना साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याची सूचना वारंवार केली जात असतानादेखील नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. मनपाच्या सूचनांकडे अकाेलेकर कानाडाेळा करीत असल्याने काेराेनाच्या प्रसाराला हातभार लागत आहे.