दुसरी पत्नी, तिच्या मित्राकडून पतीला लोखंडी पाईपने मारहाण
By Admin | Updated: May 24, 2017 01:39 IST2017-05-24T01:39:05+5:302017-05-24T01:39:05+5:30
अपत्य होत नसल्याने पहिल्या पत्नीच्या संमतीने केला दुसरा विवाह

दुसरी पत्नी, तिच्या मित्राकडून पतीला लोखंडी पाईपने मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: खडकी येथील रहिवासी इसमाची दुसरी पत्नी व तिच्या मित्राने पतीला मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी विद्युत भवन परिसरात घडली. या प्रकरणी रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी सदर इसमाच्या दुसऱ्या पत्नीसह तिच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
खडकी परिसरातील सौदामिनी वसाहत येथील रहिवासी इसमाचे एका युवतीशी लग्न झाले होते; मात्र या दाम्पत्याला मूलबाळ होत नसल्याने उभयतांनी एकमेकांच्या संमतीने २०१३ मध्ये दूसऱ्या विवाहाला मान्यता दिली. त्यामुळे या इसमाने दुसरा विवाह केला. दूसऱ्या विवाहानंतर या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाले. या वादातून त्यांची दुसरी पत्नी ही वाद झाल्यानंतर दोन ते तीन दिवस घर सोडून जात होती. त्यानंतर ती परत येत होती. अशातच दूसऱ्या पत्नीला एक मुलगी झाली. या मुलीला सोडूनही ती प्रत्येक वेळी घर सोडून जात होती. या प्रकारामुळे सदर इसम व दूसऱ्या पत्नीमध्ये वाद वाढल्याने दूसऱ्या पत्नीने पतीविरोधात खदान पोलीस स्टेशनला मारहाणीची तक्रार दिली होती; दरम्यान दूसरी पत्नी आणि तिचा मित्र हे दोघे मंगळवारी दुचाकीवरून विद्युत भवनासमोरून जात असताना असताना पतीला दिसले. पतीने दूसऱ्या पत्नीच्या मित्राचे घर गाठून पत्नीला घरी परत चलण्याची विनंती केली असता त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर त्याची दूसरी पत्नी आणि तिचा मित्र या दोघांनी संगनमताने तिच्या पतीला लोखंडी पाइपने मारहाण केली.
गंभीर जखमी झालेल्या पतीने तत्काळ रामदासपेठ पोलीस स्टेशनला दुसरी पत्नी व तिचा मित्र याच्याविरोधात तक्रार केली. यावरून पोलिसांनी सदर दोघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात रामदासपेठ पोलिस पुढील तपास करीत आहेत.