अकोला: राज्यात कोविड लसीकरणाला उत्साहात सुरुवात झाली. प्रत्येक जिल्ह्यात सुमारे दोन लाखांपेक्षा जास्त लाभार्थींनी कोविड लस घेतली, मात्र दुसऱ्या डोससाठी लस उपलब्धच नसल्याने अनेकांना लसीची प्रतीक्षा असल्याचे चित्र आहे. अमरावती विभागात वाशिम आणि अकोला जिल्ह्यात दुसऱ्या डोसचे सर्वात कमी लसीकरण झाले, तर विदर्भात दुसऱ्या डोसचे सर्वात कमी लसीकरण गडचिरोली जिल्ह्यात झाल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे.
राज्यात आतापर्यंत १ कोटी ७५ लाख १ हजार ३१ लाभार्थींंनी कोविडची लस घेतली आहे. यामध्ये बहुतांश एक कोटी ४३ लाख ३६ हजार ९१३ लाभार्थींना लसीचा पहिला डोस मिळाला आहे, तर सुमारे ३१ लाख लाभार्थींना कोविडचा दुसरा डोस मिळाला आहे. विदर्भाचा विचार केल्यास बहुतांश लाभार्थींना पहिला डोस मिळाला, मात्र दुसऱ्या डोससाठी अनेकांना पायपीट करावी लागत आहे. अनेकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला होता, मात्र मागील दोन आठवड्यांपासून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोव्हॅक्सिनचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे लाभार्थींना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ झाला आहे. विदर्भात दुसऱ्या डोसचे सर्वात कमी लसीकरण गडचिरोली जिल्ह्यात झाले असून त्यापाठोपाठ गोंदिया, अकोला आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे.
विदर्भात लसीकरणाची स्थिती
जिल्हा - पहिला डोस - दुसरा डोस - एकूण
अकोला - १,८०,४६८ - ४१०४७ - २, २१,५१५
अमरावती -२,७०,३६५ - ६५,५८० - ३, ३२, ९४५७५
वाशिम - १,४६,२१६ - २४,०१० - १,७०,२२६
बुलडाणा - २,५९,४०१ - ५२,२७६ - ३,११,३८०
यवतमाळ - २,४०,६८१ -४५,८८५ - २,८६,५६६
चंद्रपूर - २,२६,६८५ - ४३,४७७ - २,७०,१६२
गडचिरोली - ८५,१५८ - १९,१९९ - १,०४,३५७
गाेदिया - १,५२,२५८ - ३०,९०७ - १,८३,१६५
नागपूर - ८,७८,११८ - १,८८,२३४ -१०,६६,३५२
वर्धा - १,९८,७६१ - ४१,८७९ - २,४०,६४०
वयोगटानुसार राज्यातील लसीकरण
वयोगट - झालेले लसीकरण
१८ ते ३० - ६ लाख २० हजार ३४६
३० ते ४५ - १४ लाख ५६ हजार ८७
४५ ते ६० - ६४ लाख ८८ हजार २३
६० वर्षावरील - ५७ लाख ७१ हजार २९६