अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीचा लावला शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:16 IST2021-04-26T04:16:26+5:302021-04-26T04:16:26+5:30
अनैतिक मानवी तस्करी कक्षाची कारवाई अकोला : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण केलेल्या एका अल्पवयीन मुलीचा अनैतिक मानवी ...

अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीचा लावला शोध
अनैतिक मानवी तस्करी कक्षाची कारवाई
अकोला : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण केलेल्या एका अल्पवयीन मुलीचा अनैतिक मानवी तस्करी कक्षाने शोध लावला. अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्यानंतर तिला पुणे येथील कोंढवा परिसरात नेण्यात आले होते, या कक्षाने शोध घेऊन तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या एका परिसरातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला पळवून नेण्यात आले होते. या प्रकरणाची तक्रार मुलीच्या पालकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३, ३६६ नुसार गुन्हा दाखल केला होता त्यानंतर या प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलिसांनी सुरू केला मात्र या मुलीचा शोध घेण्यात त्यांना यश न आल्याने पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या संकल्पनेतून स्थापन करण्यात आलेल्या अनैतिक मानवी तस्करी कक्षाने मुलीचा शोध सुरू केला. त्यानंतर पुणे येथील कोंढवा परिसरात मुलगी असल्याची माहिती या कक्षाला मिळाली. या माहितीवरून एका पथकाने मुलीला पुणे येथून ताब्यात घेतले. अकोल्यात आणल्यानंतर या मुलीला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी तस्करी कक्षाचे प्रमुख संजय राऊत, महिला पोलीस अधिकारी प्रीती ताठे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश गावंडे, सुलभा ढोले, विजय खर्चे, सूरज मंगरुळकर, संजय कोलहटकर, पूनम बचे, पंकज पांडे, भावना पोटे यांनी केली.