‘स्वच्छता मिशन’ची ‘ऐसीतैशी’

By Admin | Updated: November 10, 2014 01:43 IST2014-11-10T01:27:37+5:302014-11-10T01:43:45+5:30

कच-याचे ढीग आणि दुर्गंधीने अकोलावासी हैरान.

'Sanitation Mission' 'Axiata' | ‘स्वच्छता मिशन’ची ‘ऐसीतैशी’

‘स्वच्छता मिशन’ची ‘ऐसीतैशी’

संतोष येलकर/अकोला
देशभरात स्वच्छ भारत मिशन राबविण्यात येत असले तरी, अकोला शहरात ठिकठिकाणी रस्त्यांच्या कडेला साचलेले कचर्‍याचे ढीग आणि दुर्गंधीने शहरवासी हैरान झाले आहेत. त्यामुळे स्वच्छता मिशनची शहरात ऐसीतैशी होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार गेल्या २ ऑक्टोबरपासून देशभरात स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. त्यानुषंगाने सर्वत्र स्वच्छता मिशनची अंमलबजावणी करण्यात येत असून, स्वच्छतेच्या उपाययोजनांना प्राधान्य दिले जात आहे. सगळीकडे स्वच्छतेचा बोलबाला सुरू असताना अकोल्यात मात्र, विविध भागात रस्त्यांवर आणि रस्त्यांच्या कडेला कचर्‍याचे ढीग साचल्याचे वास्तव रविवारी दिसून आले. शहरातील मध्यवर्ती बसस्थानक ते टॉवर चौक, भाजी बाजार, बस स्थानकामागील परिसर, फतेह चौक ते दीपक चौक, आकोट स्टॅन्ड व इतर भागात रस्त्यांच्या कडेला कचर्‍याचे ढीग साचले असून, हा कचरा रस्त्यावर पसरत आहे. वार्‍याच्या सुसाट्यात रस्त्यांवरून कचरा उडत आहे. उडणारा कचरा डोळ्यात जात आहे. तसेच भाजी बाजार, शासकीय विश्रामगृह समोर व बस स्थानकामागील परिसरात रस्त्यांवर सडका भाजीपाला, हिरव्या नारळाची टरफले, प्लास्टिक पिशव्या, पृष्ठ आणि कागदाचे तुकडे व काडीकचरा कुजत असून, त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. शहरातील इतर भागातही असेच असाच अनुभव येत असून, कचर्‍याच्या ढिगांसोबतच मोकाट जनावरांचा मुक्त संचारही सर्रास सुरू आहे. कचर्‍याच्या समस्येने नागरिक हैरान असून, यासंदर्भात प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. ते बघता स्वच्छता मिशनचा अकोल्यात बोजवारा उडत असल्याचे दिसत आहे.

Web Title: 'Sanitation Mission' 'Axiata'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.