मार्च एण्डिंगची धावपळ, मग पंचनामे कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:18 IST2021-03-26T04:18:31+5:302021-03-26T04:18:31+5:30
खरिपात अतिवृष्टीमुळे सोयाबीन करपले. बोंडअळीने कापसाची पार दैना केली. पेरणीसाठी लावलेला खर्चही निघाला नाही. तरी पुन्हा जोमाने उभे राहत ...

मार्च एण्डिंगची धावपळ, मग पंचनामे कधी?
खरिपात अतिवृष्टीमुळे सोयाबीन करपले. बोंडअळीने कापसाची पार दैना केली. पेरणीसाठी लावलेला खर्चही निघाला नाही. तरी पुन्हा जोमाने उभे राहत शेतकऱ्यांनी रब्बीच्या पिकांची पेरणी केली. पुरेसे सिंचन उपलब्ध असल्याने गहू, हरभरा पिके चांगली झाली; मात्र ऐन काढणीच्या हंगामात अवकाळी पावसाने सर्व दाणादाण उडाली. जिल्ह्यात १८ ते २१ चार दिवस पावसाने हजेरी लावली. गहू घरात येण्याआधीच भिजला. ज्वारी, कांदा, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले. कृषी विभागाने या नुकसानाचा प्राथमिक अहवाल तयार केला. यामध्ये १८ व १९ तारखेला जिल्ह्यात ४ हजार ७७० हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले, तसेच २० व २१ या तारखेलाही गारपिटीने नुकसान झाले. या नुकसानाचे तातडीने पंचनामे करणे गरजेचे होते; परंतु अद्यापही कृषी व महसूल विभागाचा कोणी कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचला नाही. त्यात मार्च एण्डिंगची धावपळ असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्याची घाई झाली आहे; मात्र पंचनामे कधी होणार? व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांकडून तत्काळ पंचनामे करण्याची मागणी होत आहे.
--कोट--
जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचमाने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लवकरच पंचनामे करण्यास सुरुवात होईल.
कांताप्पा खोत, जिल्हा कृषी अधीक्षक.
--कोट--
शेतकऱ्यांचे दु:ख कोणाला कळेनासे झाले आहे. मार्च एण्डिंग आर्थिक व्यवहारासाठी असते. तलाठी व कृषी सहायकांना आदेश दिल्यास पंचनामे होऊ शकतात. विनाकारण मार्च एण्डिंगचे कारण पुढे केले जात आहे.
मनोज तायडे, संयोजक, शेतकरी जागर मंच.