सत्ताधारी, विरोधक आमने-सामने!
By Admin | Updated: May 27, 2017 00:58 IST2017-05-27T00:58:52+5:302017-05-27T00:58:52+5:30
करवाढीच्या विरोधात काँग्रेसने दिले धरणे; महापौरांनी केले करवाढीचे समर्थन

सत्ताधारी, विरोधक आमने-सामने!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केल्यानंतर महापालिका प्रशासनाने अकोलेकरांवर अवाजवी कर वाढ लादल्याचा आरोप करीत मनपातील विरोधी पक्ष काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी मनपा कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी महापौर विजय अग्रवाल यांच्या खुर्चीला निवेदन सादर करून काँग्रेसने सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाच्या विरोधात निषेध व्यक्त केला.
मनपा प्रशासनाने वेळोवेळी मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्याची गरज होती. मागील १९ वर्षांपासून मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन न करता प्रशासनाने अचानक करवाढीचा निर्णय घेतला. मनपा प्रशासनाने प्रथमच इमारतीच्या चटई क्षेत्राचे मोजमाप करून त्यावर कर आकारल्यामुळे नागरिकांना मोठ्या कर रकमेच्या नोटिस प्राप्त होत आहेत. नागरिकांना दुप्पट नव्हे तर तीनपट,चारपट कर लागू होत असल्याचे समोर येताच मनपा प्रशासनाप्रती रोष व्यक्त केला जात आहे. सत्ताधारी भाजपने अकोलेकरांवर लादलेली कर वाढ त्वरित रद्द करण्याची मागणी करीत मनपातील विरोधी पक्ष काँग्रेसच्यावतीने मनपा कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन छेडले. विरोधी पक्षनेता साजीद खान यांनी सत्ताधारी भाजप तसेच प्रशासनाच्या मनमानी कारभारावर जोरदार हल्ला चढवला. सभागृहात बहुमत असल्यामुळे सत्ताधारी भाजपने मनमानी निर्णय घेण्याचा सपाटा लावला असून, प्रशासनाच्या हुकूमशाहीसमोर सर्वसामान्य अकोलेकर, व्यावसायिक त्रस्त झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. प्रशासनाने ही करवाढ त्वरित मागे घ्यावी,अन्यथा आगामी दिवसांत उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा विरोधी पक्षनेता साजीद खान यांनी दिला. काँग्रेसचे महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, माजी आ.लक्ष्मणराव तायडे, मदन भरगड यांनी विचार व्यक्त केले. धरणे आंदोलनात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दादाराव मते पाटील, रमाकांत खेतान, नगरसेवक पराग कांबळे, मोहम्मद नौशाद, मो.इरफान खान,चंद्रकांत सावजी, निखिलेश दिवेकर, प्रकाश तायडे, राजेश मते पाटील,रवी शिंदे, सीमा ठाकरे, पुष्पा गुलवाडे, विभा राऊत, राजेंद्र चितलांगे, अनंतराव बगाडे, संजय मेश्रामकर, अभिषेक भरगड, सुरेश ढाकोळकर, डॉ.मोहर खरे, प्रा.राजाभाऊ देशमुख, डॉ.महेश गणगणे, आकाश सायखेडे, जनार्दन बुटे, आझाद खान,सुरेश राऊत, प्रल्हाद ढोरे, गणेश कटारे, अख्तर चौव्हाण, सुनील सोनटक्के, हरीश कटारिया, अविनाश देशमुख, मनीष हिवराळे आदी पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकप्रतिनिधींच्या घरासमोर घंटानाद!
सत्ताधारी व प्रशासनाने करवाढीचा निर्णय मागे न घेतल्यास टप्प्या-टप्प्याने संपूर्ण शहरात आंदोलन उभारणार असल्याचे विरोधी पक्षनेता साजीद खान यांनी स्पष्ट केले. भाजपचे खासदार, पालकमंत्री, आमदार तसेच नगरसेवकांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महापौरांच्या खुर्चीला निवेदन
अकोलेकरांवर लादलेली करवाढ अन्यायकारक असून, ती रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन घेऊन विरोधी पक्षनेता साजीद खान, माजी महापौर मदन भरगड तसेच कार्यकर्त्यांनी महापौर विजय अग्रवाल यांचे दालन गाठले. त्यावेळी महापौर दालनात उपस्थित नसल्याचे पाहून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महापौरांच्या खुर्चीला निवेदन सादर केले.