युवकाचा कुजलेला मृतदेह सापडला; घातपाताची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 17:41 IST2020-09-19T17:41:16+5:302020-09-19T17:41:49+5:30
युवकाची आत्महत्या आहे की घातपात, या दिशेने पोलीस तपास करीत आहेत; मात्र सदर युवकाची हत्याच केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

युवकाचा कुजलेला मृतदेह सापडला; घातपाताची शक्यता
अकोला : डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रिया टॉवर येथील तिसऱ्या माळ्यावरील एका फ्लॅटमध्ये ३८ वर्षीय युवकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या युवकाची आत्महत्या आहे की घातपात, या दिशेने पोलीस तपास करीत आहेत; मात्र सदर युवकाची हत्याच केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
प्रिया टॉवरमधील तिसºया माळ्यावरील एका फ्लॅटमध्ये प्रवीण विनायकराव कराळे (३८) हे रहिवासी होते; मात्र शनिवारी प्रवीण कराळे यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी आल्याने परिसरातील नागरिकांनी डाबकी रोड पोलिसांना माहिती दिली. या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर चौकशी सुरू केली असता प्रवीण यास मद्याचे प्रचंड व्यसन असल्याची माहिती समोर आली. प्रवीण कराळे यांची हत्या केल्याची चर्चा घटनास्थळावर असल्याने पोलिसांनीही आता त्या दिशेने तपास केल्यास प्रवीणच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे. या घातपाताची माहिती मिळाल्यानंतर डाबकी रोड पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांनीही तातडीने धाव घेऊन चौकशी सुरू केली. दरम्यान, पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. उत्तरीय तपासणीच्या अहवालानंतर या प्रकरणातील सत्यता समोर येणार आहे.