सिंधी कॅम्पमध्ये घरफोडी; साडेतीन लाखांची रोकड अन् दागिने पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 14:15 IST2019-07-01T14:15:47+5:302019-07-01T14:15:52+5:30
सिंधी कॅम्पमधील पेन्शनपुरा येथील एका इसमाच्या घरी अज्ञात चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री चोरी करून सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना उघडकीस आली आहे.

सिंधी कॅम्पमध्ये घरफोडी; साडेतीन लाखांची रोकड अन् दागिने पळविले
अकोला: खदान पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या सिंधी कॅम्पमधील पेन्शनपुरा येथील एका इसमाच्या घरी अज्ञात चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री चोरी करून सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाची तक्रार खदान पोलीस ठाण्यात देण्यात आली असून, पोलिसांनी रविवारी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता.
पेन्शनपुरा येथील रहिवासी परळीकर हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले असता त्यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरातील एका कपाटात असलेली ३ लाख ५० हजार रुपयांची रोकड आणि दुसऱ्या कपाटातील सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी पळविले. परळीकर यांचे कुटुंबीय शनिवारी रात्री परत आले असता त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी कपाटातील रोख व दागदागिने तपासले असता ते अज्ञात चोरट्यांनी पळविल्याचे समोर आले. त्यांना या चोरीची माहिती मिळताच परळीकर हे तातडीने खदान पोलीस ठाण्यात गेले त्यांनी या प्रकरणाची तक्रार केली. परळीकर यांच्या घरातून सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला असून, खदान पोलिसांनी रविवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल केला नव्हता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.