उद्योजक नवल केडिया यांच्या निवासस्थानी दरोडेखोरांचा हैदोस; लाखोंचा मुद्देमाल लंपास
By आशीष गावंडे | Updated: June 28, 2024 00:07 IST2024-06-28T00:06:11+5:302024-06-28T00:07:04+5:30
न्यू आळशी प्लॉट येथील घटना

उद्योजक नवल केडिया यांच्या निवासस्थानी दरोडेखोरांचा हैदोस; लाखोंचा मुद्देमाल लंपास
आशिष गावंडे, अकोला: शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या न्यू आळशी प्लॉट येथील रहिवासी प्रख्यात उद्योजक नवल केडिया यांच्या निवासस्थानी दरोडेखोरांनी हैदोस घालत शस्त्रांचा धाक दाखवून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. दरोडेखोरांनी चार चाकी वाहनातून पळ काढला. दरम्यान, या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या न्यू आळशी प्लॉटमध्ये उद्योजक नवल केडिया यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास चार चाकी वाहनातून आलेल्या चार ते पाच दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. दरोडेखोरांनी कुटुंबातील सदस्यांना शस्त्रांचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे केडिया कुटुंबीय दहशतीच्या सावटाखाली आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, खदान पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गजानन धंदर त्यांच्या ताफ्यासह किडिया यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते.
खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीत धाडसी चोरी, दरोडय़ाची मालिका
खदान पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सहकार नगर मध्ये भरतीया नामक उद्योजकाकडे धाडसी चोरी झाल्याची घटना ६ मे रोजी उघडकीस आली होती. त्यानंतरही या पोलिस स्टेशनच्या हद्दीत अनेक चोऱ्या झाल्या. आता न्यू आळशी प्लॉटमध्ये पडलेल्या सशस्त्र दरोड्यामुळे खदान पोलिस ठाण्यातील गोपनीय शाखेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
दरोडेखोरांच्या तपासासाठी आम्ही संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. -सतीश कुलकर्णी, शहर पोलीस उपअधीक्षक अकोला