‘ओरडू नका, नाहीतर तुमच्या मुलाला मुंबईत मारुन टाकू’
By आशीष गावंडे | Updated: June 28, 2024 21:13 IST2024-06-28T21:13:22+5:302024-06-28T21:13:35+5:30
केडिया यांच्या निवासस्थानी पाेलिसांच्या वेषात आलेल्या चाेरट्यांचा हैदाेस

‘ओरडू नका, नाहीतर तुमच्या मुलाला मुंबईत मारुन टाकू’
आशिष गावंडे, अकाेला: जिल्हा पाेलिस अधीक्षक कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या न्यू आळशी प्लॉट येथील उद्योजक नवलकिशाेर केडिया यांच्या निवासस्थानी पाेलिसांच्या वेषात आलेल्या चाेरट्यांनी बंदूक व चाकूच्या धाकावर हैदाेस घातल्याचे शुक्रवारी समाेर आले. घरात शिरलेल्या चाेरट्यांनी केडिया यांच्या गळ्याला चाकू लावत ‘ओरडू नका, नाहीतर तुमच्या मुलाला मुंबइत जीवे मारुन टाकू’अशी धमकी दिल्याचे केडिया यांनी पाेलिस तक्रारीत नमुद केले. याप्रकरणी शुक्रवारी खदान पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या न्यू आळशी प्लॉटमध्ये उद्योजक नवलकिशाेर केडिया यांच्या निवासस्थानी २७ जून राेजी रात्री १० ते १०:३० वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात इसमांनी शिरकाव केला. यातील एका चाेरट्याने पाेलिसांचा गणवेश परिधान केला हाेता. एका मुलीचा शाेध घेत असल्याचे सांगत चाेरट्यांनी घरात प्रवेश केला. या इसमांची वर्तणूक संशयास्पद असल्याचे ध्यानात येताच केडिया यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी यातील एका चाेरट्याने केडिया यांच्या गळ्याला चाकू लावत ‘तुमच्या मुलाला मुंबइत मारुन टाकू,त्याठिकाणी आमची माणसे उभी आहेत’, अशी धमकी देत लुटमार केली. घरातील माेलकरणींच्या कानातील साेन्याचा दागिना हिसकावून घेत कपाटात शाेधाशाेध केली. जे हातात येइल ते घाइघाइत लुटून चाेरट्यांनी चारचाकी वाहनातून पळ काढला. याप्रकरणी खदान पाेलिसांत भादंवि कलम ३९२, ३९७, ४५२,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांकडून कसून शाेध
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या निर्देशानुसार ‘एलसीबी’प्रमुख शंकर शेळके यांनी तपासकामी पथके रवाना केली आहेत. आराेपींचा सुगावा लागल्यास ९९२१०३८१११ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून याेग्य ते बक्षिस दिले जाणार आहे.