रस्त्यालगत बांधकाम साहित्य; ३० हजारांचा दंड वसूल
By Admin | Updated: May 12, 2014 23:28 IST2014-05-12T22:59:19+5:302014-05-12T23:28:40+5:30
अतिक्रमण विभागाची धडक मोहीम सुरू

रस्त्यालगत बांधकाम साहित्य; ३० हजारांचा दंड वसूल
अकोला : रस्त्यालगत बांधकाम साहित्य ठेवणार्या बांधकाम व्यावसायिकांना मनपाने वठणीवर आणण्याचा चंग बांधला आहे. त्यामधूनच अतिक्रमण विभागाने सोमवारपासून धडक मोहीम सुरू करीत पहिल्याच दिवशी ३० हजार रुपयांची गंगाजळी मनपाच्या तिजोरीत जमा केली. मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशानुसार ही मोहीम संपूर्ण शहरात राबवली जाणार आहे.
महापालिकेच्या नगर रचना विभागातील अधिकारी व पदाधिकारी खिशात असल्याच्या आविर्भावात काही बांधकाम व्यावसायिकांनी नियमांची ऐशीतैशी करीत बांधकाम केले. नगरसेवकांपासून लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वांच्या ओळखीचा गैरफायदा घेण्यात येत आहे. त्यामुळेच निर्माणाधीन इमारतींचे साहित्य रस्त्यालगत ठेवल्या जात आहे. यामुळे परिसरातील नागरिकांसह दुचाकीस्वार कमालीचे त्रस्त होत आहेत. वाहतूक विस्कळीत होण्यासोबतच अपघातांचे प्रमाणदेखील वाढले आहे. या सर्व बाबी लक्षात घेता, मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी रस्त्यालगत बांधकाम साहित्य ठेवणार्यांविरुद्ध दंडात्मक मोहीम सुरू केली आहे. त्यानुषंगाने अतिक्रमण विभाग प्रमुख विष्णू डोंगरे यांनी रविवारी व सोमवारी मुख्य रस्त्यावरून फेरफटका मारला असता, रणपिसे नगरस्थित बारा ज्योतिर्लिंग मंदिरासमोर रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर बांधकाम साहित्य आढळून आले. गोपाल सोमानी नामक व्यावसायिकाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून, रस्त्यालगत रेती, गिी पसरल्याचे दिसून आले. याप्रकरणी सोमानी नामक व्यावसायिकाला १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. राऊतवाडी परिसरात चेतन ठाकरे तसेच श्रीराम कन्स्ट्रक्शनच्या बांधकाम व्यावसायिकांनासुद्धा प्रत्येकी १० हजार रुपये दंड आकारला. ही मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
५ हजारासाठी तीन तास अन् आता...
उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांनीसुद्धा यापूर्वी अशाच प्रकारची मोहीम राबवली होती. बारा ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात अवैध बांधकाम करणार्या एका बांधकाम व्यावसायिकाने रस्त्यालगत रेती, गिी, विटा ठेवल्याप्रकरणी डॉ. गुटे यांनी ५ हजाराचा दंड बजावला होता. त्यावेळी संबंधित व्यावसायिकाने पैसे देण्यासाठी डॉ. गुटे यांना अक्षरश: तीन तास ताटकळत ठेवले होते. आता निमूटपणे दहा हजार रुपये मनपाकडे जमा केले. मागील काही दिवसांपासून संबंधित व्यावसायिकाचा नातेवाईक अवैध बांधकामावर कारवाई टाळण्यासाठी आयुक्तांवर दबावतंत्राचा वापर करीत असल्याची माहिती आहे. या दबावतंत्राला आयुक्त कसे उत्तर देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.