योजनांचा आढावा विधी शिबिरातही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:26 IST2017-08-28T01:26:44+5:302017-08-28T01:26:44+5:30
अकोला : शासनाच्या विविध योजनांचा आढावा समाधान शिबिरात घेतल्यानंतर आता उच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीकडूनही योजनांची आढावा, माहिती विधी सेवा शिबिरात दिली जाणार आहे. त्यासाठीची तयारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने सुरू केली. येत्या सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात ही शिबिरे होणार आहेत.

योजनांचा आढावा विधी शिबिरातही
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शासनाच्या विविध योजनांचा आढावा समाधान शिबिरात घेतल्यानंतर आता उच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीकडूनही योजनांची आढावा, माहिती विधी सेवा शिबिरात दिली जाणार आहे. त्यासाठीची तयारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने सुरू केली. येत्या सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात ही शिबिरे होणार आहेत.
लाभार्थींना योजनांचे लाभ वितरित होण्यासाठी जिल्हा विधी सेवा शिबिरात माहिती दिली जाणार आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी तयार केलेल्या योजना, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती देणे, त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचणे, यासाठी विधी सेवा शिबिरात योजनांचा आढावा घेण्याचे नागपूर उच्च न्यायालयातील विधी सेवा उप-समितीने बजावले आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातही येत्या सप्टेंबरमध्ये विधी सेवा शिबिर आयोजित केली जात आहेत. त्यामध्ये शासनाच्या विविध योजना राबवणार्या सर्वच शासकीय विभागांकडून योजनांची संपूर्ण माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने मागवली आहे. त्यासाठीची जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांची पहिली बैठकही पार पडली. त्यामध्ये विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश यांनी संबंधितांना माहिती सादर करण्याचे बजावले आहे. या माहितीसोबतच जिल्ह्यातील विधी सेवा शिबिराची रूपरेषाही संबंधित अधिकार्यासमक्ष ठरवण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाच्या विविध अधिकार्यांना बैठकीत बोलावण्यात आले. त्यामध्ये विशेषत: सहायक आयुक्त समाजकल्याण, उपविभागीय महसूल अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी, समाजकल्याण अधिकारी, महिला व बालकल्याण अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सर्व विभाग, शिक्षणाधिकारी, कृषी विकास अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा, नरेगा सहायक गटविकास अधिकारी यांच्यासोबतच अनेक विभागप्रमुखांचा सहभाग आहे.