कृषी विद्यापीठाच्या संशोधनावर परिणाम
By Admin | Updated: August 22, 2014 00:27 IST2014-08-21T23:58:03+5:302014-08-22T00:27:51+5:30
पावसाने फिरवली पाठ, पाण्याचे स्रोतही आटले

कृषी विद्यापीठाच्या संशोधनावर परिणाम
अकोला - पावसाने पाठ फिरवली असून, पाण्याचा मुख्य स्रोतही बंद झाल्याने सध्या विहिरींच्या पाण्यावर संशोधनासाठी घेतलेली पिकं जगविण्याचा प्रयत्न डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून केला जात आहे. पाणीच नसल्याने संशोधनासाठी घेतलेली पिकं जगविण्यासाठी उन्हाळ्य़ात पाणी आणावे तरी कोठून, असा प्रश्न कृषी विद्यापीठासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढच्या खरीप हंगामात विदर्भातील शेतकर्यांना सरळ व देशी वाण मिळेल की नाही, हाही प्रश्न निर्माण झाला आहे. कृषी विद्यापीठाकडे संशोधनासाठी जवळपास पाच हजार एकरपेक्षा जास्त शेती आहे. यात सर्वाधिक शेतजमीन वणीरंभापूर येथील मध्यवर्ती संशोधन केंद्रांतर्गत आहे. या दोन्ही प्रक्षेत्रांवर विविध संशोधन केंद्र आहेत; पण पाणीच उपलब्ध नसल्याने या संशोधन केंद्रांच्या शास्त्रज्ञांपुढे यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. कमी खर्चाचे तंत्रज्ञान, कृषी निविष्ठा अर्थात बी-बियाण्यांवर संशोधन करू न ते शेतकर्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी या शास्त्रज्ञांवर आहे. त्याकरिता शास्त्रज्ञांच्या वेतनावर मोठा खर्च शासनाकडून केला जातो. भारतीय कृषी संशोधन परिषद, केंद्र व राज्य शासन या संशोधनाकरिता निधी उपलब्ध करू न देते; तथापि यावर्षी पावसाने पाठ फिरवली आणि पाण्याचे कायमस्वरू पी स्रोत उपलब्ध नसल्याने, येत्या उन्हाळ्य़ात शास्त्रज्ञांना हातावर हात धरू न बसावे लागण्याची शक्यता आहे. अकोल्याच्या कृषी विद्यापीठावर मागासलेल्या विदर्भाची मोठी जबाबदारी आहे. यापूर्वी याच कृषी विद्यापीठाने विविध वाण विकसित करू न शेतकर्यांना दिलासा दिला आहे. विदर्भात प्रामुख्याने कापूस व धान हे पीक घेतले जात असल्याने, शास्त्रज्ञांनी त्यादृष्टीने संशोधन केले. दिवसभर शास्त्रज्ञ प्रक्षेत्रावर कार्यरत असायचे. डॉ. तय्यब यांनी एचफोर ही कापसाची जात विकसित केली. महाराष्ट्र, गुजरात या राज्यांमध्ये या कापसाच्या जातीने क्रांती केली. डॉ. एल.के. मेश्राम यांनी रंगीत कापसाची जात विकसित केली. त्याकरिता त्यांनी जंगली कापसावर संशोधन केले. त्यावेळी पाण्याची सोय होती आणि ती काळाची गरजही होती. आज त्याहीपेक्षा मोठे आव्हान आहे; पण पाणीच नाही. कृषी विद्यापीठाला मोर्णा धरणातून पाणी मिळत होते. त्यामुळे विद्यापीठातील शरद सरोवरात मुबलक पाणी असायचे. हे सरोवर कृषी विद्यापीठाची मुख्य धमणी आहे. या तलावातून संशोधन प्रकल्पापर्यंत पाणी सोडले जायचे; पण गत काही वर्षांपासून कृषी विद्यापीठाला मोर्णा धरणातून पाणी मिळणे बंद झाले आहे. त्याचा परिणाम संशोधनावर होत आहे. यावर्षी अकोल्यातील मध्यवर्ती संशोधन प्रकल्पाच्या ११५0 हेक्टर प्रक्षेत्रापैकी केवळ २0 टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी करण्यात आली आहे. त्याचा परिणाम बीजोत्पादन, बियाणे उत्पादनावर होत आहे. त्यामुळे संशोधनही प्रभावित होत आहे. यावेळी थोड्याफार क्षेत्रावर केलेली पेरणीही उन्हाळ्य़ात तग धरेल की नाही, हा प्रश्न उभा ठाकला आहे.