हॉटेलमध्ये दारू पिण्यावर निर्बंध
By Admin | Updated: June 16, 2017 00:42 IST2017-06-16T00:42:57+5:302017-06-16T00:42:57+5:30
हॉटेल मालकही होणार सहआरोपी : पोलिसांच्या लेखी नोटिस

हॉटेलमध्ये दारू पिण्यावर निर्बंध
सचिन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहरातील खुले मैदान आणि भग्नावस्थेत पडलेल्या इमारतींमध्ये दारू पिणाऱ्यांचा पोलिसांनी विशेष मोहिम राबवून बंदोबस्त केला. त्यानंतर तळीरामांनी दारू पिण्यासाठी परवाना नसलेल्या हॉटेलचा आधार घेतला आहे. शहरातील काही हॉटेलमध्ये तळीरामांना दारू पिण्याची सुविधा देण्यात येत असल्याने अकोला पोलिसांनी अशा हॉटेल मालकांना नोटिस बजावत सहआरोपी करण्याचे फर्मान जारी केले आहेत.
राष्ट्रीय आणि राज्य महामहार्गापासून ५०० मीटर अंतराच्या आतमध्ये असलेले वाइन बार, वाइन शॉप आणि बीअर शॉपी बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर जिल्ह्यातील वाइन बार आणि बीअर शॉपी बंद केल्याने त्यांनी दारूची ‘पार्सल’ घेऊन खुले मैदान आणि मिळेल त्या जागेवर दारू पिण्यासाठी ठिय्या तयार केला; मात्र स्थानिक रहिवाशांना त्रास होत असल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या. त्यानंतर पोलिसांनी विशेष मोहीम राबवून खुले मैदानासह अन्य ठिकाणी दारू पिणाऱ्यांचा बंदोबस्त केला. तळीरामांचा वांधा झाल्याने त्यांनी वाइन बारचा परवाना नसलेल्या छोट्या-मोठ्या हॉटेलचा आधार घेत दारू पिण्यासाठी जागेची सोय केली; मात्र खदान पोलिसांनी हॉटेल मालकांना लेखी नोटिस बजावल्या असून, हॉटेलमध्ये तळीरामांना दारू पिण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्यास त्यांच्यावरच फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे. पोलिसांच्या हॉटेल मालकांवरील कारवाई करण्याच्या इशाऱ्यामुळे आता तळीरामांचे आणखी वांधे झाले आहेत. दारू पिणाऱ्यांमुळेच प्रचंड वाद होत असल्याने खदान पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील दारू पिण्याऱ्यांचा बंदोबस्त केला आहे. यानंतर संपूर्ण शहरात हा प्रयोग राबविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
वाहनतळाची योग्य सुविधा द्या!
हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेले ग्राहक दारूही त्याच हॉटेलमध्ये पित आहेत. त्यामुळे तळीरामांच्या बैठकीसाठी एक पर्याय उपलब्ध झाला. या प्रकारामुळे नेहरू पार्क चौकातील हॉटेलसह शहरातील काही हॉटेलच्या समोर वाहनांची मोठी गर्दी होत आहे.
४रस्त्यावर वाहने येत असल्याने अपघात होत असून, या ग्राहकांना वाहने ठेवण्यासाठी वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील हॉटेलवर राहणार वॉच
केवळ खानावळ म्हणून असलेल्या हॉटेलमध्ये दारू विक्री किंवा दारू पिणाऱ्यांसाठी सुविधा करून दिल्यास त्यांच्यावर कडक वॉच राहणार आहे. तळीरामांना दारू पिण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्यास अशा प्रकारच्या हॉटेल मालकांवर फौजदारी कारवाईचा खदान पोलिसांचा प्रयोग जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
खदान पोलिसांचा प्रयोग
सद्यस्थितीत जिल्ह्यात सर्वाधिक वाइन बार आणि बीअर शॉप खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू आहेत. गोरक्षण रोडवर तळीरामांची मोठी गर्दी होत असल्याने या परिसरातील नागरिकांनी आंदोलन करून विरोधही केला होता. त्यामुळे पोलिसांनी विशेष मोहीम राबवून तळीरामांचा बंदोबस्त केला. त्यानंतर या परिसरातील हॉटेल मालकांना त्यांच्या हॉटेलमध्ये दारू पिणारे दिसल्यास सहआरोपी करण्याच्या लेखी नोटिस बजावल्या आहेत.