अकोला: जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक निकालानंतर २०२० ते २०२५ या कालावधीसाठी जिल्ह्यातील सर्व ५३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला. त्यानुसार १ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सातही तहसीलस्तरावर सरपचपदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर करण्यात येणार असून, ३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात महिला सरपंचपदांची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रक्रियेत १० ग्रामपंचायती अविरोध झाल्याने, २१४ ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले असून, ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल १८ जानेवारी रोजी जाहीर झाले.दरम्यान, जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांची आरक्षण सोडत ग्रामपंचायतींच्या निवडणुकांपूर्वी जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आली होती; मात्र जाहीर करण्यात आलेले सरपंचपदांचे आरक्षण रद्द करून, ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर नव्याने सरपंचपदांची आरक्षण सोडत काढण्याचा आदेश शासनाच्या ग्रामविकास विभागाने गत महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. त्यानुसार जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांनंतर २०२० ते २०२५ या कालावधीसाठी जिल्ह्यातील सर्व ५३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २१ जानेवारी रोजी जाहीर केला. त्यानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण इत्यादी प्रवर्गनिहाय सरपंचपदांची आरक्षण सोडत जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयस्तरावर १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता संबंधित तहसील कार्यालयात काढण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील महिला सरपंचपदांची आरक्षण सोडत ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात काढण्यात येणार आहे.
तालुकानिहाय ग्रामपंचायतींची
अशी आहे संख्या!
तालुका ग्रा.पं.
तेल्हारा ६२
अकोट ८४
मूर्तिजापूर ८६
अकोला ९७
बाळापूर ६६
बार्शीटाकळी ८०
पातूर ५७
...............................................
एकूण ५३२
सरपंचपदांसाठी प्रवर्गनिहाय अशी
काढण्यात येणार आरक्षण सोडत!
जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी १ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील तहसील कार्यालयस्तरावर प्रवर्गनिहाय सरपंचपदांची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती १२५, अनुसूचित जमाती ४५, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग १४४ व सर्वसाधारण प्रवर्गासाठी २१८ सरपंचपदांकरिता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील एकूण सरपंचपदांच्या ५० टक्के महिला सरपंचपदांसाठी ३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.