सिमेंट रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा!

By Admin | Updated: May 23, 2017 01:24 IST2017-05-23T01:24:21+5:302017-05-23T01:24:21+5:30

मनपा आयुक्तांचे निर्देश; बांधकाम विभागाची यंत्रणा सरसावली

Repair cement roads urgently! | सिमेंट रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा!

सिमेंट रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहरात निर्माण झालेल्या सिमेंट रस्त्यांची दुरुस्ती करण्याची वेळ अवघ्या सहा महिन्यांत महापालिका प्रशासनासह कंत्राटदारावर आल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर मनपाच्या प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे. सदर रस्त्यांच्या कामकाजाचा अहवाल तयार करून रस्त्यांची तातडीने दुुरुस्ती करण्याचे निर्देश मनपा आयुक्त अजय लहाने यांनी सोमवारी बांधकाम विभागाला दिले.
महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यांचे निर्माण कार्य सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने सिमेंट रस्त्यांचा समावेश आहे. मनपा आयुक्त अजय लहाने यांनी रस्ता रुंदीकरणाचा निर्णय घेत ‘वर्किंग एस्टीमेट’मध्ये बदल केला होता. तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी प्रस्तावित केलेल्या १८ फूट रुंदीच्या रस्त्यांमध्ये बदल करीत आयुक्त लहाने यांनी प्रशस्त रस्त्यांना प्राधान्य दिले. शहरात निर्माण केले जाणारे रस्ते प्रामुख्याने ३८ ते ४० फूट रुंद केले जात आहेत. यामध्ये मुख्य पोस्ट आॅफिस ते सिव्हिल लाइन चौक, दुर्गा चौक ते अग्रसेन चौक आणि माळीपुरा ते मोहता मिलपर्यंत तीन सिमेंट रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौकपर्यंतच्या रस्त्याचे काम निर्माणाधीन आहे. सिमेंट रस्त्यांची कामे स्थानिक ‘आरआरसी’ कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतली आहेत. यापूर्वी प्रतिभा कन्स्ट्रक्शनने तयार केलेल्या सिमेंट रस्त्यांचा दर्जा अद्यापही कायम असल्याचे दिसून येते. दर्जेदार सिमेंट रस्त्यांसाठी मनपा आयुक्त अजय लहाने आग्रही असल्याचे वारंवार समोर आले आहे. अशा स्थितीत दुर्गा चौक ते अग्रसेन चौक आणि सिव्हिल लाइन रोडवर ‘प्लास्टिक सायजर लिक्विड’ द्वारे पॅचिंग करण्याची वेळ कंत्राटदारावर आल्याने अकोलेकरांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शहर अभियंत्यांनी केली पाहणी
माळीपुरा ते मोहता मिल आणि अशोक वाटिका ते सर्वोपचार रुग्णालयापर्यंतचा सिमेंट रस्तादेखील ‘आरआरसी’ कंपनीने केला आहे. दोन्ही रस्ते वगळल्यास दुर्गा चौक ते अग्रसेन चौक आणि सिव्हिल लाइन रोडवरील ‘स्लरी’ निघत असल्याचा मुद्दा समोर आला. त्यामुळे संबंधित रस्त्यांची पाहणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी जारी क रताच सोमवारी शहर अभियंता इक्बाल खान, कनिष्ठ अभियंता कृष्णा वाडेकर यांच्यासह संबंधित यंत्रणेने सिमेंट रस्त्यांची पाहणी केली.

‘क्युरिंग’असेल तरच टिकेल रस्ता!
सिमेंट रस्ता असो वा नाल्यांवर निर्माण केल्या जाणारे धापे टिकाऊ राहण्यासाठी ‘क्युरिंग’ची नितांत गरज भासते. सिमेंट रस्ता तयार करतेवेळी अनेकदा ‘क्युरिंग’चा अभाव दिसून येतो. सिमेंट रस्त्यांना निकषानुसार ठरावीक कालावधीसाठी पाणी देण्याची गरज आहे.

चारपैकी दोन सिमेंट रस्त्यावरील ‘स्लरी’ निघत असल्याची बाब समोर आली आहे. ती का निघते, यासंदर्भात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
- अजय लहाने, आयुक्त, मनपा

Web Title: Repair cement roads urgently!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.