धार्मिक स्थळे हटणार; पूर्व झोनमध्ये कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2016 02:09 IST2016-01-20T02:09:06+5:302016-01-20T02:09:06+5:30
२0 जानेवारीपासून पूर्व झोनमधील धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश.

धार्मिक स्थळे हटणार; पूर्व झोनमध्ये कारवाई
अकोला: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून शहरातील धार्मिक स्थळे हटविण्यासाठी मनपा प्रशासनाने तयारी केली असून, २0 जानेवारीपासून पूर्व झोनमधील धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी क्षेत्रीय अधिकार्यांना दिले. मंगळवारी मनपा आयुक्तांच्या दालनात चारही क्षेत्रीय अधिकार्यांची बैठक पार पडली.
शहरातील मुख्य रस्त्यांलगत तसेच चौकाचौकांत व गल्लीबोळात धार्मिक स्थळे उभारण्यात आली आहेत. ही स्थळे हटविण्याबाबत थेट सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यानुसार मनपाने पहिल्या टप्प्यात २00९ नंतर उभारलेली धार्मिक स्थळे हटविण्यासाठी तयारी केली आहे. यासंदर्भात मंगळवारी मनपा आयुक्त अजय लहाने यांच्या दालनात अधिकार्यांची बैठक पार पडली. बैठकीला तहसीलदार हागे, प्रभारी नगर रचनाकार प्रवीण दांदळे, संदीप गावंडे, क्षेत्रीय अधिकारी जी.एम. पांडे, अनिल बिडवे, कैलास पुंडे, वासुदेव वाघाडकर, पोलीस निरीक्षक खांडेकर, म्हाडाचे शाखा अभियंता भुसारी आदी उपस्थित होते.
२00९ पूर्वीची स्थळे हटवा!
पहिल्या टप्प्यात शहरात २00९ नंतर उभारलेल्या धार्मिक स्थळांची संख्या ५६ आहे. ही कारवाई सुरू असतानाच २00९ पूर्वी उभारण्यात आलेल्या २२२ धार्मिक स्थळांवर कारवाई केली जाईल. यामध्ये प्रामुख्याने मुख्य रस्त्याला अडथळा निर्माण होणार्या स्थळांचा समावेश राहील. तत्पूर्वी संबंधितांना बाजू मांडण्यासाठी १५ दिवसांची नोटीस दिली जाणार आहे.