बीएचआरच्या अकोला शाखेद्वाराही ठेवी परत देण्यास नकार
By Admin | Updated: February 24, 2015 01:24 IST2015-02-24T01:23:43+5:302015-02-24T01:24:19+5:30
शेकडो ठेवीदारांचे सुमारे १५ कोटी रुपये फसल्याचा पोलिसांचा अंदाज.

बीएचआरच्या अकोला शाखेद्वाराही ठेवी परत देण्यास नकार
अकोला : भाईचंद हिरानंद रायसोनी (बीएचआर) मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीमधील आर्थिक घोटाळय़ाचे लोण आता अकोला शाखेतही पसरले आहे. बीएचआर सोसायटीच्या अकोला शाखेने ठेवीदारांची रक्कम परत करण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी सोमवारी ठेवीदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार अकोल्यातील ठेविदारांची सुमारे १५ कोटींची रक्कम सदर पतसंस्थेत अडकून पडली आहे. बीएचआर क्रेडिट सोसायटीने विविध प्रकारच्या मासिक ठेव योजना सादर करून, मुदती ठेवींवर ११ टक्के ते १२ टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखविले होते. आकर्षक व्याज दरामुळे शहरातील शेकडो नोकरदार तसेच सेवानवृत्त नागरिकांनी सदर पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली. अकोलेकरांनी एक लाखापासून २0 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी वर्ष, दोन वर्षांसाठी सदर पतसंस्थेत ठेवल्या आहेत. मुदत ठेवीची देय तारीख जवळ आल्याने, गुंतवणूकदारांनी गांधी रोडवरील बीएचआर क्रेडिट सोसायटीच्या शाखेत धाव घेतली असता, स्थानिक व्यवस्थापनाने त्यांच्या ठेवी परत देण्यास नकार दिला. त्यामुळे गुंतवणूकदार कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रारी देत आहेत.
*१९ लाखांच्या फसवणूकप्रकरणी ३३ जणांविरुद्ध गुन्हा
बीएचआर क्रेडिट सोसायटीविरुद्ध तक्रार देणार्या गुंतवणूकदारांची संख्या वाढत आहे. आश्रयनगरात राहणारे सेवानवृत्त सैनिक गजानन रामसा धामंदे यांनी पतसंस्थेविरोधात पोलिसांकडे सर्वप्रथम तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी पतसंस्थेच्या सुवर्णलक्ष्मी मासिक प्राप्ती योजनेत ८ जानेवारी २0१४ ते ८ जानेवारी २0१५ या कालावधीसाठी १९ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. ही रक्कम देण्यास बीएचआर सोसायटीने नकार दिल्याने धामंदे यांनी सोमवारी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून आरोपी प्रमोद भाईचंद रायसोनी (५४, रा. जळगाव) याच्यासह ३३ जणांविरुद्ध भादंविचे कलम ४0९, ४२0, १२0 ब आणि महाराष्ट्र ठेवीदार हितसंबध संरक्षण अधिनियम १९९९ कलम ३ नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
*ठेवीदारांच्या तक्रारी वाढल्या
हरिहरपेठेत राहणारे अतुल शेगावकर यांनी ८६ हजार रुपयांची मुदती ठेव ठेवली होती. त्याची मुदत १0 फेब्रुवारीपर्यंत होती. शेगावकर हे रक्कम काढण्यासाठी गेले असता, त्यांनाही पैसे देण्यास नकार मिळाला. कुळकर्णी नामक व्यक्तीनेसुद्धा बीएचआरमध्ये दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवली. त्यांनाही रक्कम मिळाली नाही. शेगावकर, कुळकर्णी, धामंदे यांच्यासह शहरातील शेकडो ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी बीएचआरमध्ये आहेत.