अॅक्टिव्ह झोनची संख्या कमी; अकोलेकरांनी खबरदारी घेण्याची गरज - संजय कापडणीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 11:48 IST2020-06-28T11:47:10+5:302020-06-28T11:48:01+5:30
महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्यासोबत साधलेला हा संवाद...

अॅक्टिव्ह झोनची संख्या कमी; अकोलेकरांनी खबरदारी घेण्याची गरज - संजय कापडणीस
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरात कोरोनाबाधित रुग्णांनी १४०० चा टप्पा ओलांडला असून, सर्वत्र संसर्गाचा धोका वाढल्याचे दिसून येत आहे. अशा स्थितीत मनपाची यंत्रणा नेमकी कोणत्या स्वरूपाच्या उपाययोजना राबवित आहेत, याबद्दल शहरवासीयांमध्ये चर्चेच्या फैरी झडत आहेत. कोरोना वाढीसाठी प्रशासनासोबतच सर्वसामान्य अकोलेकरांनी फिजीकल डिस्टन्सिंगच्या नियमांकडे पाठ केल्याचे परिणाम समोर आले आहेत. यासंदर्भात महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्यासोबत साधलेला हा संवाद...
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कशी झाली?
कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना तसेच संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविल्या जात आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगदरम्यान लक्षणे आढळून येणारे नागरिक आजार लपवित असल्याचे मनपा पथकांच्या निदर्शनास आले. अनेक भागात संदिग्ध रुग्णांची समजूत काढताना कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला.
संसर्गाला आळा घालण्यासाठी कोणता उपाय केला?
कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या बैदपुरा भागात नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी शिबिराचे आयोजन केले. तसेच भरतीया रुग्णालयात ‘स्वॅब’ संकलन सुरू केले. याप्रमाणेच दक्षिण झोनमध्ये सिंधी कॅम्प परिसर, पश्चिम झोनमधील हरिहरपेठ, उत्तर झोनमध्ये विजय नगर, आयुर्वेदिक रुग्णालयात तातडीने संदिग्धांचे स्वॅब घेण्याला प्रारंभ केला. आजरोजी बैदपुरा कोरोनामुक्त झाला, याकडेही लक्ष द्यावे लागेल.
मृत्यू दराच्या टक्केवारीत वाढ कशी?
दुर्धर आजार, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असलेल्या वयोवृद्ध नागरिकांसाठी कोरोना दुर्दैवी ठरला. कोरोनावर प्रभावी औषधी नसल्याने प्रतिकारशक्ती वाढविण्याची औषधी दिली जाते. या औषधीला वयोवृद्ध नागरिक कितपत प्रतिसाद देतात, यावर सर्व अवलंबून असल्याने मृत्यू दरात वाढ झाल्याचे ध्यानात येते.
वाढत्या रुग्णसंख्येसाठी मनपा जबाबदार आहे का?
तसे म्हणता येणार नाही. याची जाण सुज्ञ अकोलेकरांना नक्कीच आहे. लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याचे अकोलेकरांना वारंवार आवाहन करण्यात आले. भाजी बाजार, किराणा दुकानात साहित्य खरेदीसाठी झुंबड उडत असल्याचे चित्र आजही कायम आहे. सुरुवातीच्या काळात कंटेनमेन्ट झोनमध्ये नागरिकांचा मुक्तसंचार होता. या बाबींकडेही लक्ष द्यावे लागेल. कोरोनाचा मुकाबला करणे ही सामूहिक जबाबदारी आहे.
कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने नागरिकांनी स्वत:ची व कुटुंबीयांची काळजी घेतल्यास प्रादुर्भाव आपोआप कमी होईल. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे तंतोतंत पालन करणे हाच प्रभावी उपाय आहे. या नियमांचे नागरिक खरेच पालन करतात का, यावरही आत्मचिंतन करण्याची गरज आहे. घरातील वयोवृद्ध नागरिक, लहान मुलांना संसर्ग होणार नाही, याकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल.