मास्कने घालविली लिपस्टिकची लाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 10:43 AM2021-04-28T10:43:42+5:302021-04-28T10:46:32+5:30

Use of Mask : काळात घराबाहेर पडताना मास्क वापरावा लागत असल्याने कॉस्मेटिकचा बाजार थंडावला आहे.

The redness of the lipstick hide by the mask | मास्कने घालविली लिपस्टिकची लाली

मास्कने घालविली लिपस्टिकची लाली

Next
ठळक मुद्देकॉस्मेटिकचा बाजार थंडावलादैनंदिन गरजा भागवणे अवघड

अकोला : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कडक संचारबंदी केल्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता अनेक छोट्या व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. त्यांच्या दैनंदिन गरजा भागवणेसुद्धा अवघड झाले आहे. यामध्ये सलून, ब्युटीपार्लर बंद आहेत. कोरोनाच्या काळात घराबाहेर पडताना मास्क वापरावा लागत असल्याने कॉस्मेटिकचा बाजार थंडावला आहे. कोरोनामुळे वर्षभरापासून कॉस्मेटिक व्यवसाय अडचणीत आला आहे. सलून, ब्युटी पार्लर अत्यावश्यक सेेवेत येत नसल्याने व्यवसाय बंद आहे. मध्यंतरी कोरोनाचे संक्रमण कमी झाल्यावर कॉस्मेटिकसह ब्युटी पार्लर व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत होता; मात्र आता कोरोना झपाट्याने वाढत आहे. परिणामी, राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीत केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. या कोरोना काळात लग्न समारंभ, कार्यक्रम २५ जणांच्या उपस्थितीत सुरू आहे. घराबाहेर पडण्याचे काम नसल्याने महिलांना ब्युटीपार्लरमध्ये जाण्याची गरज भासत नाही. यामुळे कॉस्मेटिकचा बाजार थंडावला आहे. या दुकानदारांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

 

२४ तास घरातच ब्युटी पार्लर हवे कशाला...?

संचारबंदीमुळे सर्व व्यवसाय ठप्प झाला आहे. कॉस्मेटिकची दुकाने बंद आहेत. साहित्य मिळत नाही. लग्न, समारंभासाठी ॲडव्हान्स पैसे घेतले असल्याने पैसे परत देण्याची वेळ आली आहे. दुकानांचे भाडे सुरूच आहे. दुकान बंद असल्याने वाढीव इलेक्ट्रिक बिल आले आहे.

ज्योती विंचणकर, ब्युटी पार्लर चालक

 

अत्यावश्यक सेवेत येत नसल्याने व्यवसाय बंद आहे. संचारबंदीआधी लग्नाच्या ऑर्डर घेतल्या आहेत; मात्र लग्न समारंभ २५ लोकांमध्ये होत असल्याने ह्या ऑर्डरही रद्द होण्याची वेळ आली आहे. महिलांना घरातच रहावे लागत आहे. व्यवसाय बंद असल्याने मोठे नुकसान होत आहे.

जयश्री खाडे, ब्युटी पार्लर चालक

 

कॉस्मिटिकची दुकाने अत्यावश्यक सेवेत येत नाहीत. त्यामुळे दुकाने बंद ठेवावी लागत आहे. व्यवसाय ठप्प झाला आहे. दुकानातील साहित्य कालबाह्य होत असून व्यावसायिकांचे मालाच्या पैशासाठी सतत फोन येत आहे. आर्थिक चक्र बंद असल्याने पैशाची जुळवाजुळव कशी करावी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रवी पंजवाणी, कॉस्मेटिक विक्रेता

 

घरीच होतो शृंगार

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ब्युटीपार्लर बंद आहे. दिवसभर घरातच राहावे लागते. त्यामुळे ब्युटीपार्लरमध्ये जाण्याची गरज भासत नाही. मागील लॉकडाऊनमध्ये ब्युटी पार्लरच्या थोड्या टिप्स माहिती करून घेतल्या होत्या. काही शृंगार करावयाचा असल्यास तो घरीच करते.

वीणा नाईक

 

२४ तास घरातच

संचारबंदी असल्याने बाहेर जाणे बंद आहे. नातेवाइकांमधील सर्व कार्यक्रम रद्द झाले आहे. एखादे लग्न असल्यास मोजक्याच पाहुण्यांमध्ये पार पडत आहे. त्यामुळे ब्युटी पार्लरमध्ये जाऊन शृंगार करणे आवश्यक वाटत नाही. घरातच २४ तास रहावे लागत आहे.

निता पाटील

Web Title: The redness of the lipstick hide by the mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.