जिल्हा परिषदेत अडकली अपहारांच्या रकमेची वसुली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:16 IST2021-02-05T06:16:30+5:302021-02-05T06:16:30+5:30
संतोष येलकर अकोला : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये विविध योजनांच्या कामांमध्ये अपहारांची ६०२ प्रकरणे सिध्द झाल्यानंतर अपहारांच्या रकमेची ...

जिल्हा परिषदेत अडकली अपहारांच्या रकमेची वसुली!
संतोष येलकर
अकोला : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये विविध योजनांच्या कामांमध्ये अपहारांची ६०२ प्रकरणे सिध्द झाल्यानंतर अपहारांच्या रकमेची वसुली मात्र जिल्हा परिषदेत अडकली आहे. गेल्या दहा वर्षांपासून अपहार प्रकरणातील ७ कोटी २२ लाख ५८ हजार ५४४ रुपयांची रक्कम वसूल करण्यासाठी कानाडोळा करण्यात आला असल्याने, अपहारांची रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया अद्यापही प्रलंबित असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे विविध योजनांच्या कामांतील अपहाराची रक्कम जिल्हा परिषद वसूल करणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ग्रामपंचायतींचा सामान्य निधी, जवाहर रोजगार योजना, जवाहर ग्रामीण संपूर्ण योजना आणि संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना इत्यादी योजनांतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना उपलब्ध झाल्या निधीमधून करण्यात आलेल्या विविध कामांमध्ये २००५ ते २०१५ या दहा वर्षांच्या कालावधीत निधी खर्चात अपहार झाला. योजनांतर्गत कामांसाठी उपलब्ध निधीच्या खर्चात जिल्ह्यात अपहार झाल्याची ६०२ प्रकरणे सिध्द झाली. अपहार सिध्द झालेल्या प्रकरणांमध्ये ७ कोटी २२ लाख ५८ हजार ५४४ रुपये अपहारांची रक्कम संबंधितांकडून वसूल करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनामार्फत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. परंतु दहा वर्षांचा कालावधी उलटून गेला असला तरी, अद्यापही अपहारांच्या रकमेची वसुली करण्यात आली नाही. अपहारांच्या ६०२ प्रकरणांतील ७ कोटी २२ लाख ५८ हजार ५४४ रुपयांची रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया प्रलंबित असल्याने, गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत विविध योजनांतर्गत अपहारांच्या प्रकरणांमधील कोट्यवधी रुपयांची रक्कम वसूल करण्याच्या कामांत जिल्हा परिषदसह संबंधित विभागांकडून कानाडोळा करण्यात आल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कारभारात अपहारांच्या रक्कमेची वसूली पूर्ण होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
योजनानिहाय अशी आहेत अपहाराची प्रकरणे व रक्कम!
योजना प्रकरणे रक्कम
ग्रामपंचायत सामान्य निधी ३७४ ३११०५७४३
जवाहर रोजगार योजना १०७ ३३२४४६४०
जवाहर ग्रामीण संपूर्ण योजना ४८ २१५४०५०
संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ७३ ५७५४१११
.......................................................................................................................
एकूण ६०२ ७२२५८५४४
रक्कम वसुलीच्या कामात
पंचायत समित्यांचीही उदासीनता!
विविध योजनांतर्गत कामांमध्ये ग्रामपंचायतींच्यास्तरावर निधीत अपहार सिद्ध झालेल्या प्रकरणांमध्ये अपहारांची रक्कम संबंधितांकडून वसूल करण्याची जबाबदारी जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांची आहे. परंतु गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत अपहार सिध्द झालेल्या ६०२ प्रकरणांत अपहराची ७ कोटी २२ लाख ५८ हजार ५४४ रुपयांची रक्कम अद्यापही वसूल करण्यात आली नाही. त्यामुळे अपहारांची रक्कम वसूल करण्याच्या कामात जिल्ह्यातील पंचायत समित्यांची उदासीनता समोर येत आहे.