युतीच्या मुद्यावर पुनर्विचार करावा!
By Admin | Updated: January 28, 2017 01:43 IST2017-01-28T01:43:40+5:302017-01-28T01:43:40+5:30
शिवसेनेकडून महसूलमंत्र्यांना अपेक्षा.

युतीच्या मुद्यावर पुनर्विचार करावा!
अकोला, दि. २७- शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे संयमी नेते आहेत. त्यांच्यासोबत माझे चांगले संबंध असून, भविष्यात भाजपसोबत कोणतीच युती राहणार नाही, अशी भाषा ठीक वाटत नाही. युतीच्या मुद्यावर ते नक्कीच पुनर्विचार करतील, असा आशावाद राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीनिमित्त ते अकोल्यात आले असता बोलत होते.
मुंबई महापालिकेच्या जागा वाटपाच्या मुद्यावरून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत असलेली युती तुटल्याचे जाहीर केले. युती नसेल तर मत विभाजनाचा काँग्रेसला फायदा होणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझे अनेक वर्षांपासून चांगले संबंध आहेत. मनपा व जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर युती तोडणे हा पर्याय होऊ शकत नसल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. राजकारणात हे असं चालायचंच असं म्हणत येत्या तीन दिवसांत उद्धवजी युतीच्या विषयावर पुनर्विचार करतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिकेपुरती युती तुटली असती, तरीही राज्यातील इतर महापालिकांसाठी ती कायम राहू शकली असती. २0१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील दोन्ही पक्षांच्या कामगिरीवर चर्चा होणे अपेक्षित होते. निवडणुकीनंतर दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता त्यांनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला चर्चेला येण्यासाठी केलेल्या आवाहनाची पाटील यांनी खिल्ली उडविली. भाजप-शिवसेना युतीचं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचे स्पष्ट करीत युती तुटल्यानं उगीच कुणी मनातल्या मनात मांडे खावू नये, असा टोला त्यांनी पवारांना लगावला.
सरकारला पाच वर्षे धक्का नाही!
भाजप-शिवसेना युतीचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ निश्चितच पूर्ण करेल, यात शंका नसल्याचा विश्वास महसूलमंत्री पाटील यांनी व्यक्त केला. मनपा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने घेतलेल्या निर्णयाचा राज्य सरकारला कोणताही धक्का लागणार नसल्याने अनेकांचे मनसुबे उधळल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.