रास्तभाव दुकाने बंद ठेवणार
By Admin | Updated: May 12, 2014 22:26 IST2014-05-12T21:35:06+5:302014-05-12T22:26:32+5:30
स्वस्त धान्य दुकानदार, केरोसीन परवानाधारक संघटनेचा इशारा

रास्तभाव दुकाने बंद ठेवणार
अकोला : विविध मागण्या मान्य करण्यात याव्या,अन्यथा येत्या ५ जूनपासून जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकाने आणि परवानाधारक किरकोळ रॉकेल विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत, असा इशारा अकोला जिल्हा सरकारी स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकार्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
अकोला शहर व तालुक्यात गेल्या महिनाभरापासून बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना गहू व तांदूळ वितरित करण्यासाठी धान्याचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांच्या रोषाचा सामना रास्तभाव दुकानदारांना करावा लागत आहे. त्यामुळे शासकीय धान्य गोदामात त्वरित धान्याचा पुरवठा करण्यात यावा तसेच शालेय पोषण आहार वितरणापोटी जिल्ह्यातील रास्तभाव दुकानदारांचे लाखो रुपये विना विलंब देण्यात यावे, जिल्ह्यात रॉकेलचा पुरवठा ५० टक्के देण्यात यावा व रॉकेल विक्रीवर प्रती लीटर १ रुपयाप्रमाणे कमिशन देण्यात यावे, रोहयो अंतर्गत कुपनांची थकबाकी रास्तभाव दुकानदारांना देेण्यात यावी, महिन्याच्या सुरुवातीला शिधापत्रिकाधारकांना रॉकेलचे वितरण करण्यात यावे इत्यादी मागण्या मान्य न केल्यास येत्या ५ जूनपासून जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकाने, रॉकेल हॉकर्स व किरकोळ रॉकेल परवानाधारक दुकाने बंद ठेवणार आहेत, असा इशारा अकोला जिल्हा सरकारी स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला. निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न मुंडे, उपाध्यक्ष मो. आरीफ मो. अश्फाक, हॉकर युनियन अध्यक्ष सै. यासिन ऊर्फ बब्बुभाई, अकोला तालुका अध्यक्ष अनिता देशमुख यांच्या स्वाक्षर्या आहेत.