मुख्यमंत्र्यांसमोर वाचला पाढा

By Admin | Updated: December 31, 2014 00:57 IST2014-12-31T00:57:05+5:302014-12-31T00:57:05+5:30

उपायुक्तांच्या कार्यपद्धतीवर लोकप्रतिनिधींचा आक्षेप.

Read in front of the Chief Minister | मुख्यमंत्र्यांसमोर वाचला पाढा

मुख्यमंत्र्यांसमोर वाचला पाढा

अकोला : तत्कालीन नगर पालिका प्रशासनाने दुकानांसाठी भाडेपट्टय़ावर दिलेली जागा अतिक्रमित कशी होऊ शकते, असा मुद्दा उपस्थित करीत व्यावसायिकांना कोणतीही पूर्वसूचना न देणे, त्यांची बाजू ऐकून न घेणे व नगर विकास राज्यमंत्र्यांच्या आदेशालाही न जुमानता दुकाने पाडण्याची कारवाई करणार्‍या उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या कार्यपद्धतीचा पाढा स्थानिक लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांसमोर वाचला. मंगळवारी आमदार गोवर्धन शर्मा,आ. रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध मुद्दय़ांवर चर्चा केली. खुले नाट्यगृहालगत नझूलच्या जागेवरील १२ दुकानांच्या भाडेपट्टय़ाची मुदत संपल्यामुळे सदर दुकाने जमीनदोस्त करण्याची कारवाई मनपा प्रशासनाने २८ डिसेंबर रोजी केली. तत्पूर्वी व्यापारी संघटनांनी एकत्र येत, कागदपत्रांची पूर्तता करीत कारवाई टाळण्याची विनंती मनपाकडे केली होती. प्रशासनाने मात्र दुकाने भुईसपाट केली. यावर विदर्भ चेंबर ऑफ कॉर्मसच्या पदाधिकार्‍यांसह व्यापारी संघटनांनी प्रशासनाच्या भूमिकेचा विरोध केला. व्यावसायिकांना बाजू मांडण्याची संधी न दिल्यामुळे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप व्यावसायिकांकडून होत आहे. प्रशासनाने के लेल्या कारवाईच्या पद्धतीवर आक्षेप नोंदवत आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात पाटील, ज्येष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल, प्रतुल हातवळणे, अजय शर्मा, विजय इंगळे यांनी ३0 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मनपा अधिकार्‍यांच्या कार्यप्रणालीचा पाढा वाचला. अतिक्रमण हटाव मोहिमेला लोकप्रतिनिधी किंवा नगरसेवकांनी यापूर्वी कधीही अडथळा निर्माण केला नाही; परंतु व्यावसायिकांची बाजू ऐकून न घेता, एकतर्फी कारवाई करण्याला स्पष्ट विरोध असल्याचे लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. यासंदर्भात ठोस निर्णय घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली असता, त्यांनी सकारात्मक संकेत दिले असे मुंबईला गेलल्या प्रतिनिधींनी सांगितले.

Web Title: Read in front of the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.