खडका येथील रास्तभाव दुकान निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 15:54 IST2020-04-08T15:54:20+5:302020-04-08T15:54:27+5:30
अनामत रक्कम शासन खात्यात जमा करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले .

खडका येथील रास्तभाव दुकान निलंबित
अकोला :तालुक्यातील खडका येथील रास्त भाव दुकान निलंबित करण्यात येत असून रास्त भाव दुकानदाराची अनामत रक्कम जमा करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु.काळे यांनी मंगळवारी दिला .
अकोला तालुक्यातील खडका येथील रास्त भाव दुकानदार लता गणेश मेश्राम यांच्याविरुद्ध जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली होती . रास्त भाव दुकानदार शिधापत्रिकाधारकांकडून जास्त दराने पैसे घेतात , धान्याचे वाटप वेळेवर होत नाही, धान्य कमी दिले जाते व पावती देण्यात येत नाही, दुकानदाराची शिधापत्रिकाधारकांसोबत व्यवस्थित वागणूक नाही, धान्य वितरणात शिधापत्रिकाधारकांना त्रास देण्यात येतो तसेच रास्त भाव दुकानात कोणत्याही प्रकारचे फलक लावण्यात आले नाही, अशा प्रकारची तक्रार खडका येथील सरपंचांनी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे केली होती. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत खडका येथील लता गणेश मेश्राम यांचे रास्त भाव दुकान निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु.काळे यांनी ७ एप्रिल रोजी दिला. तसेच संबंधित रास्त भाव दुकानदाराची अनामत रक्कम शासन खात्यात जमा करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले . खडका येथील रास्त भाव दुकान निलंबित करण्यात आल्याने संबंधित दुकान तानखेड येथील आशिष मेश्राम यांच्या रास्त भाव जोडून खडका येथील शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण तातडीने सुरू करण्याचे निर्देश पुरवठा अधिकारी काळे यांनी तहसीलदारांना दिले .