‘आरबीएसके’ ठरतेय बाल स्वास्थ्यासाठी संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 14:32 IST2019-06-16T14:31:25+5:302019-06-16T14:32:11+5:30
अकोला : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शाळांमध्ये होणारी आरोग्य तपासणी गोरगरीब बालकांसाठी संजीवनी ठरत आहे.

‘आरबीएसके’ ठरतेय बाल स्वास्थ्यासाठी संजीवनी
अकोला : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शाळांमध्ये होणारी आरोग्य तपासणी गोरगरीब बालकांसाठी संजीवनी ठरत आहे. गत वर्षभरात शंभराहून अधिक हृदयविकाराच्या, तर २० पेक्षा जास्त डोळ्यांच्या तिरळेपणाच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. हृदयविकाराशी लढा देत ‘आरबीएसके’ची ही मोहीम आणखी जलद होणार आहे.
प्रत्येक शैक्षणिक सत्रात दोन टप्प्यांत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये आढळणाऱ्या विविध आजारांचे निदान केले जात असले, तरी हृदयविकार आणि डोळ्यांच्या तिरळेपणाच्या उपचारावर जास्त भर दिला जातो. गत वर्षभरात १३० पेक्षा जास्त हृदयविकाराच्या संशयित बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, १०० पेक्षा जास्त बालकांना हृदयविकार असल्याचे निष्पन्न झाले. या बालकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने त्यावर उपचार करणे त्यांच्या कुटुंबीयांना शक्य नाही, अशा परिस्थितीत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम या कुटुंबीयांसाठी संजीवनी ठरत आहे. गत वर्षभरात या १०० रुग्णांवर मुंबई येथे हृदयाच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या या प्रयत्नांमुळे या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
शेकडो कुटुंबीयांना मिळाला दिलासा!
यापूर्वी बालकांमध्ये हृदयविकार असल्याचे उशिरा निष्पन्न होत असल्याने त्यांना प्राण गमवावे लागत होते; परंतु राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांच्या या मोहिमेमुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात अशा रुग्णांचे निदान होण्यास मदत होत आहे. बालकांमध्ये आढणाºया अशा रुग्णांना शोधून त्यांच्यावर योग्य उपचार झाल्याने शेकडो कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.
‘आरबीएसके’अंतर्गत दरवर्षी बालकांमध्ये मोठ्या प्रमाणात हृदयविकार असल्याचे निदर्शनास येत आहे. या बालकांमध्ये आजाराचे निदान करून त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. हा लढा असाच कायम राहणार आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.