रामटेके हल्ला प्रकरणाला कलाटणी!
By Admin | Updated: July 23, 2014 00:54 IST2014-07-23T00:54:14+5:302014-07-23T00:54:14+5:30
नगरसेवक अजय रामटेके यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, हल्ल्यामध्ये सहा नव्हे तर ८ ते ९ लोकांचा समावेश असल्याचे पोलिस तपासात समोर येत आहेत.

रामटेके हल्ला प्रकरणाला कलाटणी!
अकोला: राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजय रामटेके यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, हल्ल्यामध्ये सहा नव्हे तर ८ ते ९ लोकांचा समावेश असल्याचे पोलिस तपासात समोर येत आहेत. एवढेच नाही तर पोलिसांना मुख्य सूत्रधाराचा छडा लावण्यात यश आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. उर्वरित तीन ते चार फरार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. ११ जुलै रोजी राष्ट्रवादीचे नगरसेवक अजय रामटेके रेल्वे स्थानकावरून ऑटोरिक्षाने घरी जात असताना दामले चौकात आरोपी शेख मोहसिन, सागर सरोदे, संतोष ऊर्फ भद्या वानखडे, सोनू जाधव, अजय ठाकूर यांच्यासह अन्य तीन ते चार आरोपींनी देशीकट्टय़ाने गोळीबार करून व कत्त्याने वार करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. पोलिसांनी यातील आरोपी शेख मोहसिन व सागर सरोदे यांना ११ जुलै रोजीच अटक केली होती. नंतर आकोट पोलिसांनी पळून जाताना भद्या व सोनू जाधव यांना १२ जुलै रोजी अटक केली. आरोपी शेख मोहसिन व सागर सरोदे यांनी हल्ल्यातील इतर आरोपींची नावे सांगितल्यामुळे पोलिसांनी अजय ठाकूर याला गजाआड केले. हे सर्व आरोपी १७ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत होते. त्यानंतर पुन्हा न्यायालयाने आरोपींना २२ जुलैपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी पाचही आरोपींची कसून चौकशी केली. आरोपींकडून हल्ल्यामध्ये आणखी चार लोकांचा समावेश असल्याची माहिती दिली. त्यांची नावेसुद्धा पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला; परंतु आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले.