देऊळ बंद: घरोघरी राम जन्मोत्सव, बंदद्वाराचे दर्शन घेऊन भाविक परतले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 12:04 IST2020-04-03T12:04:31+5:302020-04-03T12:04:47+5:30
मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा आदर्श घेत श्रीराम भक्तांनीदेखील शासनाने दिलेल्या मर्यादा न ओलांडता घरात थांबूनच जन्मोत्सव साजरा केला.

देऊळ बंद: घरोघरी राम जन्मोत्सव, बंदद्वाराचे दर्शन घेऊन भाविक परतले!
- नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: चैत्र मासातील शुद्ध नवमी तिथी. आंबा आणि कडूलिंबाच्या मोहोराचा दरवळणारा सुगंध. उष्ण वातावरण आल्हाददायक करणारा. दोन प्रहराच्या मधात माथ्यावर येऊन थांबलेला सूर्य, अशा वातावरणात गुरुवारी श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
कोरोना विषाणू संसर्ग धोका लक्षात घेता, देश ‘लॉकडाऊन’ आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा आदर्श घेत श्रीराम भक्तांनीदेखील शासनाने दिलेल्या मर्यादा न ओलांडता घरात थांबूनच जन्मोत्सव साजरा केला.
शहरातील मंदिरात रामजन्म
टिळक मार्गावर मोठे राम मंदिर, गांधी मार्गावर छोटे राम मंदिर, बिर्ला कॉलनीतील बिर्ला राम मंदिर या प्रमुख राम मंदिरांसह शहरातील इतर मंदिरांमध्ये अत्यंत साध्या रीतीने पूजा-अर्चना करून राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
मंदिराबाहेरून दर्शन
‘लॉकडाऊन’ असतानादेखील काही भाविक श्रीराम दर्शनासाठी घराबाहेर पडले. मंदिराचे कवाड बंद असूनही बाहेरूनच श्रीराम चरणी नतमस्तक झाले.
राम-जानकी पादुका पूजन
श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्यावतीने रामनवमीच्या पर्वावर परंपरेनुसार श्रीराम-जानकी पादुका पूजन वेदपाठी ब्राह्मणांच्या वेदमंत्राने करण्यात आले. सर्व सेवाधिकारी आमदार गोवर्धन शर्मा, गंगादेवी शर्मा, समितीचे अध्यक्ष विलास अनासने, मनीषा अनासने, कृष्णा शर्मा, अर्चना शर्मा, अनुप शर्मा, आरती शर्मा, गिरीश जोशी, गिरिराज तिवारी व अनिल मानधने यावेळी उपस्थित होते. पंडित हेमंत शर्मा, राजेश तिवारी, राजेश शर्मा यांनी पूजा केली. महाआरती व अभिषेक करण्यात आला. अयोध्या येथील २४ चिन्हांकित श्रीराम-जानकी चरण पादुका अनुष्ठानचे पूजन करण्याची परंपरा असून, शोभायात्रेत ही पादुका सोबत असते. यावर्षी सर्व भक्तांच्या कल्याणासाठी तसेच कोरोना पृष्ठभूमीवर विशेष अनुष्ठान करण्यात आल्याचे आमदार शर्मा यांनी सांगितले.
सहा हजार गरजूंना रामप्रसाद
श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्यावतीने गुरुवारी अकराव्या दिवशीसुद्धा सहा हजार गरजूंना रामप्रसाद वितरित करण्यात आला. शहरातील माता नगर, शंकर नगर, लाडीस फैल, परदेशीपुरा, बाळापूर नाका, न्यू गुरुदेव नगर, कमला नेहरू नगर, अनिकट या भागात प्रसादाचे वाटप करण्यात आले.
शोभायात्रा आणि रामदरबार केला ‘मिस’
श्रीराम शोभायात्रा समिती आणि श्रीराम जन्मोत्सव समितीच्यावतीने दरवर्षी मोठ्या प्रमाणात राम जन्मोत्सव साजरा करण्यात येतो; मात्र यावेळी शोभायात्रा रद्द झाली. गांधी चौकातील राम दरबारही उभारण्यात आला नसल्याने हे खूप ‘मिस’ करीत असल्याच्या भावना अकोलेकरांनी व्यक्त केल्या.
घरात बसून रामभक्ती
घरोघरी गीत रामायणातील गाण्याचे स्वर बाहेर ऐकू येत होते. अनेकांनी रामचरितमानसचे पठण केले. संस्कार भारती, राणी सतीधाम आदी संघटना, संस्थांनी समाजमाध्यमांतून घरबसल्या भजन ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली. नामवंत गायकांनी लाइव्ह व्हिडिओद्वारा राम भक्तांच्या घरी हजेरी दिली.