राजू उगले दूरसंचार सल्लागार समितीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:32 IST2021-02-06T04:32:16+5:302021-02-06T04:32:16+5:30
फोटो: राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षा उपाययोजनांचे उल्लंघन म्हातोडी : राष्ट्रीय महामार्गावर काम करणाऱ्या राजपथ इन्फ्राकॉन कंपनीकडून फोरलेनचे काम सुरू आहे. ...

राजू उगले दूरसंचार सल्लागार समितीवर
फोटो:
राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षा उपाययोजनांचे उल्लंघन
म्हातोडी : राष्ट्रीय महामार्गावर काम करणाऱ्या राजपथ इन्फ्राकॉन कंपनीकडून फोरलेनचे काम सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजू खोदलेल्या आहेत. परंतु कंपनीकडून रेडियमच्या पट्ट्या, सूचना फलक लावलेले नाहीत. कंपनीकडून सुरक्षा उपाययोजनांचे उल्लंघन होत असल्याने, कारवाई करण्याची मागणी माजी पं.स. सदस्य रूपाली सतीश गोपनारायण यांनी पालकमंत्र्यांकडे गुरुवारी केली.
दुचाकीची सायकलला धडक, एक गंभीर
बाळापूर : भरधाव दुचाकीने सायकलला धडक दिल्याने सायकलस्वार गंभीर जखमी झाला. विनाक्रमांकाच्या भरधाव दुचाकीने व्याळा येथील हरिभाऊ मांगटे यांच्या सायकलला धडक दिली. यात मांगटे जखमी झाले. दुचाकीस्वार शुभम इंगळे हासुद्धा जखमी झाला. दोघांवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बेवारस आढळलेला बैल केला परत
पणज : दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई येथील मो. मकसूद यांचा बैल हरवला होता. त्यांचा बैल सावरा मंचनपूर परिसरात शेतमजूर गणेश कबाडे यांना बेवारस चरताना दिसून आला. ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांनी हा बैल मकसूद यांना परत केला. या वेळी तंटामुक्ती अध्यक्ष प्रफुल्ल गुप्ता, पोलीस पाटील शिल्पा सपकाळ, डॉ. नीलेश काळपांडे उपस्थित होते.
खरप येथील बैलजोडी चोरीला
आपातापा : खरप येथील नितीन प्रकाश घोडस्कार यांच्या मालकीची ५० हजार रुपये किमतीची बैलजोडी घरासमोर बांधलेली असताना, मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू केला आहे.
अकोट येथे मराठी राजभाषादिनी व्याख्यानमाला
अकोट : शिवछत्रपती साम्राज्य ग्रुपतर्फे २७ फेब्रुवारी रोजी कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त व्याख्यानमाला आयोजित केली आहे. त्यासाठी संस्थेच्या कार्यालयात नोंदणी करण्याचे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष प्रवीण बोंद्रे यांनी केले.
अन्सारउल्ला खान यांचा सत्कार
बार्शीटाकळी : येथील दूध व्यावसायिक अन्सारउल्ला खान करामतउल्ला खान यांची जिल्हा दूध सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल बुधवारी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष कुद्दुसउल्ला खान यांनी सत्कार केला. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, अ. कुद्दुस अ. गफ्फार, नगराध्यक्ष हाजी महफुज खान, बबलू काजी उपस्थित होते.
लोहारा येथे लसीकरण मोहीम
उरळ : लोहारा येथे गावातील बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. ३१ जानेवारी राेजी गावात पोलिओ बूथ लावण्यात आले होते. आरोग्यसेविका सुरळकर यांनी लसीकरण केले. या वेळी अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. घरोघरी जाऊनही लसीकरण करण्यात आले.
लोहारा येथे सैनिकाचा सत्कार
लोहारा : लोहारा येथील जवान रत्नदीप मोरे हे देशाची सेवा करून नुकतेच गावी परतले. त्यानिमित्त त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यांनी राजौरी येथे सैन्यात कर्तव्य बजावले. या वेळी ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. त्यांचा लहान भाऊ प्रदीप मोरे हासुद्धा सैन्यात कार्यरत आहे.
माधुरी गवई रा.काँ. कामगार सेलच्या जिल्हाध्यक्षपदी
अकोट : राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी माधुरी विशाल गवई यांची सेलचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष धमेंद्र सिरसाट यांनी नियुक्ती केली. सिरसाट यांनी त्यांना नुकतेच नियुक्तीचे पत्र प्रदान केले.
धुक्यामुळे हरभरा पिकाला फटका
सिरसोली : गत काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. ग्रामीण भागात पहाटेला धुके पडत असल्याने, हरभरा पिकाला फटका बसला आहे. धुक्यामुळे हरभरा पिवळा पडत आहे. धुक्यामुळे हरभरा पिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.
कनेक्टिव्हीटी नसल्याने ग्राहक त्रस्त
आलेगाव : येथील बँकेमध्ये गत काही दिवसांपासून नेट कनेक्टिव्हीटी नसल्यामुळे कामे खोळंबली आहेत. त्यामुळे खातेदारांना त्रास होत आहे. कनेक्टिव्हीटी नसल्यामुळे खातेदारांना बँकेत ताटकळत बसावे लागत आहे किंवा बँकेत चकरा माराव्या लागत आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
रेतीची वाहतूक, ट्रक पकडला
दहीहांडा : वडद खु. येथील पूर्णा नदीच्या पात्रातून रेतीचा अवैध उपसा होत आहे. मंगळवारी ठाणेदार महेश गावंडे यांनी छापा घालून रेतीची वाहतूक करणारा एमएच ३० जे ०८४९ क्रमांकाचा ट्रक जप्त केला. पोलिसांनी अजय ज्ञानदेव लोणाग्रे, महेंद्र सुधाकर धनभर (रा. किनखेड) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.
वरूर ते कालवाडी रस्त्याची दुरवस्था
वरूर जवूळका : वरूर जवूळका ते कालवाडी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी बांधकाम उपविभाग अकोट कार्यालयाकडे केली आहे.
वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
खानापूर : परिसरातील शेतांमध्ये हरभरा, तूर, कपाशी आदी पिके आहेत. या पिकांमध्ये रानडुकरे, हरीण, माकडे शिरत असून, वन्य प्राण्यांनी उच्छाद मांडला आहे. वन्य प्राणी पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी
पिंजर : परिसरातील शेतांमध्ये हरभरा, गहू पीक आहे. या पिकांना शेतकरी पाणी देत आहेत. परंतु शेतीसाठी रात्री वीजपुरवठा करण्यात येतो. शेतकऱ्यांना रात्री शेतात जाऊन पिकांना पाणी द्यावे लागते. दिवसा वीजपुरवठा सुरू केल्यास शेतकऱ्यांचा त्रास कमी होईल, याकडे महावितरणने लक्ष द्यावे.