परतीच्या पावसाचा फटका; ज्वारीला फुटले कोंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 02:07 PM2019-10-23T14:07:18+5:302019-10-23T14:08:01+5:30

ज्वारीचे पीक जमिनीवर असल्याने पावसामुळे ज्वारीच्या कणसांना कोंब फुटल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे.

Rainfall hit crops in Akola district | परतीच्या पावसाचा फटका; ज्वारीला फुटले कोंब!

परतीच्या पावसाचा फटका; ज्वारीला फुटले कोंब!

Next

- संतोष गव्हाळे
हातरुण - खारपाणपट्टयातील शेतशिवारात ज्वारीचे उत्तम पीक शेतकर्‍यांना चार पैसे हाती देईल, अशी स्थिती असताना परतीच्या पावसाने ज्वारी काळी पडण्याच्या मार्गावर आहे. शेतात सोंगलेले ज्वारीचे पीक जमिनीवर असल्याने पावसामुळे ज्वारीच्या कणसांना कोंब फुटल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे.
   पेरणी केल्यानंतर अधून-मधून या पिकांवर वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांचा प्रादूर्भाव झाला. ढगाळ वातावरणामुळे ज्वारीचे पीक उत्तम प्रकारे येऊ शकले नाही. ज्वारीच्या कणसांची वाढ झाली मात्र, कणसे सुकण्याच्या मार्गावर असतांना पावसाने हजेरी लावली. शेतशिवारात ज्वारी चे काढणीची प्रक्रिया सुरू असतांना परतीच्या पावसामुळे कणसं पावसाच्या पाण्यामुळे भिजले. त्यामुळे कणसांणा कोंब फुटले आहेत. पांढरी शुभ्र येणारी ज्वारी ही काळसर स्वरूपाची तयार होण्याची शक्यता आहे. निमकर्दा, हातरुण, शिंगोली, मालवाडा, लोणाग्रा, हातला, मंडाळा, खांबोरा, बोरगाव, मांजरी, कंचनपूर, बादलापूर, अमानतपूर ताकोडा फाटा, अंदुरा शेतशिवारातील ज्वारी पीक अनेक ठिकाणी मातीत गेले आहे. कणसे काळी पडली आहेत. तसेच दाण्याला कोंब फुटले असून बुरशी आली आहे. परतीच्या पावसाची रिपरिप गेल्या तीन दिवसांपासून सुरू असल्याने सोगलेले सोयाबीन, ज्वारी कणसे भिजली असून पावसापासून पिकाचा बचाव करण्यासाठी गंजी वर ताडपत्री ने झाकून ठेवण्याची लगबग दिसून आली.  उडीद, सोयाबीन आणि ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. सातत्याने मागील तीन ते चार वर्षांपासून सोयाबीनच्या पिकाने दगा दिल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली. मुंग, उडीद, सोयाबीन पिकाचा पेरणीपासून केलेला खर्चही वसूल न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पावसामुळे थंडीसुद्धा वाढली आहे. पिके काढणीत असताना पाऊस झाल्यामुळे उत्पादन आणि दर्जावर परिणाम जाणवणार आहे. खरीप पिकांना सर्वाधिक झळ बसली आहे. परतीच्या पावसाने वेचणीचा कापूस भिजला आहे. पावसाची रिपरिप सुरू असल्याने शेती कामांची लगबग कमी झाली.


निसर्गाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला!

   मागील तीन दिवसापासून परतीच्या पावसाने खारपाणपट्टयातील शेतशिवारात जोरदार हजेरी लावली. सध्या शेतशिवारात उडीद, सोयाबीन, ज्वारी काढणी चे काम सुरू असून कापूस वेचणीला सुरूवात झाली आहे. पावसाची रिपरिप सुरु असल्याने काढणीच्या कामात !अडचण निर्माण झाली असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. उडीद, सोयाबीन, ज्वारी पिकाला कोंब फुटले असून ज्वारी काळी पडली आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अवकाळी पावसाने उडीद, सोयाबीन आणि ज्वारीला कोंब फुटले आहेत. पिकांचे नुकसान झाल्याने कर्ज कसे फेडावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळी सारखा सण तोंडावर असतांना निसर्गाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात आहे.
  - संजय घंगाळे, शेतकरी.
 

Web Title: Rainfall hit crops in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.